मुंबई : आरसीएफ पोलिसांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीकडून १३ कोटी रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले.
शहरात अंमली पदार्थांचा विळखा वाढत असून तो रोखण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत. मार्च महिन्यात चेंबूर येथील आरसीएफ पोलिसांना एमडी या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी एक संशयीत येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे ४५ ग्रॅम एमडी सापडले. त्याची किंमत साडेचार लाख रुपये एवढी होती.
चौकशीत आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी मुंबई आणि नवीन मुंबई परिसरातील विविध ठिकाणी छापे टाकून अंमली पदार्थांच्या तस्करीत सक्रिया असलेल्या टोळीतील अन्य चार जणांना अटक केली. त्यांच्याकडून ६ किलो ६८८ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत १३ कोटी ३७ लाख ६० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मागील काही दिवसातील कारवाया
१५ मे २०२५ गुन्हे शाखेने जोगेश्वरी परिसरात केलेल्या कारवाईत दोन किलो मेफेड्रोनसह (एमडी) दोन तस्करांना अटक केली. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत चार कोटी रुपये होती.
१७ मे २०२५ नालासोपारा येथील तुळींज पोलिसांनी नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगर परिसरात छापा टाकून ५ कोटी ६० लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एका नायजेरियन महिलेला अटक केली असून तिचा साथीदार फरार आहे. ही महिला घरातच कुकरमध्ये अंमली पदार्थ बनवत होती.
२९ एप्रिल साकीनाका पोलिसांनी वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीत सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत आठ कोटी चार लाख रुपये होती. या कारवाईत सादिक सलीम शेख (२८) आणि सिराज सुलतान पंजवानी (५७) यांना अटक केली.
एमडीची विक्री जोरात
एमडी साधारण २००० नंतर वितरित होऊ लागले. सुरुवातीला त्याला अंमली पदार्थ म्हणून घोषित करण्यात आले नव्हते. प्रतिबंधित नसल्यामुळे राजरोसपणे त्याची निर्मिती व विक्री केली जात होती. त्याचा प्रभाव कोकेनसारखाच असतो. मात्र कोकेनपेक्षा एमडीची किंमत तुलनेने कमी आहे. तसेच एमडीच्या निर्मितीसाठी लागणारी रसायने सहज उपलब्ध होत असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते. त्यामुळे एमडीच्या मागणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई पोलिसांनी दोन वर्षांमध्ये एमडी तस्करी व विक्रीबाबत ४९५ गुन्ह्यांची नोंद केली असून या गुन्ह्यांमध्ये ७१८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मागील काही वर्षातील जप्त एमडी
२०१८ – १० कोटी
२०१९ – तीन कोटी
२०२० – पाच कोटी २१ लाख
२०२१ – ३२ कोटी २९ लाख रुपये
२०२४ – ४५० कोटी रुपये