मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगरमधील रहिवाशांना सेवाशुल्काच्या थकबाकीची देयके पाठविली आली होती. सेवाशुल्काच्या थकबाकीची २०२१ ते २०२३ दरम्यानची ३५ हजार रुपयांची देयके पाहून रहिवाशी हवालदिल झाले होते. अखेर मोतीलाल नगरमधील रहिवाशांना म्हाडाने दिलासा दिला असून वाढीव सेवाशुल्काचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

म्हाडा वसाहतीतील रहिवाशांना पाणीपुरवठ्यासह इतर सोयी उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात मुंबई मंडळाकडून सेवाशुल्क आकारले जाते. त्यानुसार मोतीलाल नगरमधील सदनिकांसाठी महिन्याला २८८ रुपये सेवाशुल्क आकारले जाते. सेवाशुल्काची देयके आता रहिवाशांना ऑनलाईन येतात. असे असताना ऑगस्ट महिन्यात २८८ रुपयांऐवजी थेट १६०० रुपयांची देयके पाठविण्यात आली होती.

महत्त्वाचे म्हणजे या देयकांमध्ये २०२१ ते २०२३ या वर्षांसाठीची ३५ हजार रुपयांची थकबाकी नमूद करण्यात आली आहे. तर २०२३ – २०२५ दरम्यानचीही थकबाकीची देयके यापुढे मुंबई मंडळाकडून पाठविली जाणार होती. त्यानुसार सप्टेंबरमध्येही वाढीव सेवाशुल्काच्या थकीत रक्कमेसह देयके पाठवण्यात आली. व्यावसायिक गाळ्यांसाठीही वाढीव रकमेची थकीत देयके पाठविण्यात आली.

कोणतीही पूर्वसूचना न देता देयके पाठविण्यात आली. तर सेवाशुल्कात वाढ कधी केली, ही वाढ का आणि कशासाठी करण्यात आली याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण मुंबई मंडळाकडून देण्यात आलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी आणि त्यांच्या संघटनांनी मुंबई मंडळ, म्हाडा उपाध्यक्ष यांच्याकडे याविषयी तक्रार करत वाढीव सेवाशुल्क रद्द करण्याची मागणी केली होती. यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता. रहिवाशांच्या इशाऱ्यानंतर मुंबई मंडळाने वाढीव सेवाशुल्क रद्द केले. आता ३५ हजार रुपयांऐवजी ९ हजार रुपयांची देयके पाठवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळाने एका पत्राद्वारे रहिवाशांना कळवले आहे. त्यामुळे हा रहिवाशांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

…..