मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागातील (सीबीआय) अधिकारी असल्याचे भासवून गॅस कर्मचाऱ्यांकडून ७१ हजार रुपये उकळणाऱ्या दोन भामट्यांना मालवणी पोलिसांनी अटक केली. या दोघांनी शनिवारी संध्याकाळी एका गॅस एजन्सीचा टेम्पो अडवून दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते.

मालाड येथील मुक्ता गॅस एजन्सीतील कर्मचारी कन्हैयालाल (३५) आणि मोईद्दीन (२६) गॅस सिलिंडरचे वितरण करण्यासाठी शनिवार, ५ जुलै रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास टेम्पोतून जात होते. त्यावेळी एका वाहनाने त्यांचा टेम्पो अडवला. त्या वाहनातून प्रवीण कुमार सिंग (३४) नावाचा इसम उतरला. त्याने आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगितले. त्याने मोईद्दीन याला एजन्सीचे नाव आणि मालकाची माहिती विचारली. टेम्पोचालकाने ‘मुक्ता गॅस एजन्सी’ आणि मालकाचे नाव आजाद खान असल्याचे सांगताच सिंग याने त्याला शिवीगाळ केली आणि दुसरा कर्मचारी कन्हैयालाल याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकारामुळे दोघे कर्मचारी घाबरले.

अपहरण करून उकळली खंडणी

यानंतर आरोपी सिंग याने कन्हैयालाल याला जबरदस्तीने आपल्या वाहनात बसवले आणि मोईद्दीन याला टेम्पो घेऊन त्यांच्या मागून येण्यास सांगितले. दोघांना मार्वे समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले. तेथे सिंग याचा दुसरा साथीदार अभिषेक विश्वकर्मा (३६) आला. या दोन्ही आरोपींनी गॅस एजन्सीचे कर्मचारी कन्हैयालाल आणि मोईद्दीन यांना मारहाण करून त्यांच्याकडून ६० हजार रुपये काढून घेतले. हे पैसे त्यांना दिवसभरातील गॅस वितरणातून मिळालेले होते. यानंतर आरोपींनी त्यांना मालाड पश्चिमेकडील काचपाडा येथे नेले आणि पुन्हा एकदा ११ हजार रुपये जबरदस्तीने घेतले. दोघांना तेथेच सोडून दोन्ही भामटे आपल्या वाहनातून निघून गेले. या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या प्रकाराबाबत रात्री मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही भामट्यांविरोधात कलम १३८, ३०९ (६), २०४, ११५ (२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहा तासांत आरोपींना अटक

गुन्हा दाखल होताच मालवणी पोलिसांनी तपास सुरू केला. त्या भामट्यांच्या वाहनाचा क्रमांक आणि इतर माहितीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला. अवघ्या ६ तासांत दोन्ही आरोपींना रविवारी सकाळी मालवणी येथून अटक केली. आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येणार आहे. त्यांनी अशाप्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यात असून त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.