मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाची मर्यादा तीन लाखांवरुन सहा लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने याबाबत आदेश काढला असून म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या महिन्यात केंद्र सरकारला विनंती केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा पाठपुरावा केला. मुंबई महापालिका आणि महानगर क्षेत्रामध्ये परवडणारी घरे अधिकाधिक नागरिकांना उपलब्ध व्हावीत, यासाठी इतरांपेक्षा वेगळे निकष लावण्याची आवश्यकता आहे, असे राज्याच्या गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वलसा नायर सिंग यांनी अलिकडेच एका कार्यक्रमात नमूद केले होते.