मुंबई : राज्यातील शासकीय भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता प्रशिक्षण कालावधीतील विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा तसेच आणि बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार शासकीय महाविद्यालयांमध्ये भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये आणि बी.एस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८ हजार रुपये इतके विद्यावेतन मिळणार आहे. हे विद्यावेतन त्यांना १ जून २०२५ पासून मिळणार आहे.
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा १ हजार ७५० रुपये इतके विद्यावेतन मिळत होते. मागील २३ वर्षापासून यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नाही. सध्याच्या महागाईचा विचार करता हे विद्यावेतन पुरेसे नाही. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांचे विद्यावेतनात १ हजार ७५० रुपयांवरून आठ हजार रुपये इतके करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या दरमहा सात हजार रुपये विद्यावेतन मिळत हाेते. मागील ८ ते ९ वर्षांपासून त्यात कोणतीही वाढ झाली नाही. याच कालावधीत वैद्यकीय, दंत, आयुर्वेद पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात तीन वेळा वाढ करण्यात आली. भौतिकोपचार व व्यवसायोपचार पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना करावे लागणारे रुग्णसेवा विषयक काम व इतर आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांचे विद्यावेतन हे फारच कमी आहे. त्यामुळे त्यांना महागाई भत्त्यासह दरमहा १० हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे, राज्यातील शासकीय परिचर्या महाविद्यालयातील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाचे विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाच्या अखेरच्या सत्रातील ६ महिने आंतरवासिता कालावधीत दररोज आठ तास व आठवड्याचे ४८ तास शुश्रुषा देण्याचे काम करतात. आपत्कालीन परिस्थितीमध्ये व संपाच्या कालावधीत हे विद्यार्थी तत्परतेने वेळोवेळी रुग्णसेवा देतात. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या सेवेचा अत्यावश्यक रुग्णसेवेस फायदा होतो. मात्र या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचे विद्यावेतन दिले जात नव्हते. मात्र केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता कालावधीत दरमहा १३ हजार १५० रुपये विद्यावेतन देण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार शासकीय परिचर्या महाविद्यालयातील बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रतिमाह आठ हजार रुपये विद्यावेतन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.