मुंबई : राज्यात मार्चच्या शेवटच्या आठवडय़ापासून ६० वर्षांवरील नागरिकाचा करोना प्रतिबंधात्मक लशीच्या वर्धक मात्रेसाठीचा प्रतिसाद वाढत आहे. राज्यातील एकूण लसीकरणाचा जोर कमी झाला असला तरी जोखमीच्या गटातील हे नागरिक वर्धक मात्रा घेण्यासाठी पुढे येत असल्याचे आढळले आहे. राज्यात १६ जानेवारीपासून आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह करोनाचा धोका अधिक असलेल्या ६० वर्षांवरील नागरिकांसाठी वर्धक मात्रा सुरू केली. या काळात तिसरी लाट सुरू असल्यामुळे सुरुवातीला ६० वर्षांवरील नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद होता. परंतु फेब्रुवारीच्या मध्यानंतर तिसरी लाट ओसरली तसा हा प्रतिसाद कमी होऊ लागला.

 मार्चमध्ये दैनंदिन सुमारे पाच ते सहा हजार नागरिक वर्धक मात्रा घेत होते. परंतु मार्चच्या तिसऱ्या आठवडय़ापासून वर्धक मात्रेच्या लसीकरणाने पुन्हा जोर धरला आहे. या काळात वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांची दैनंदिन संख्या १० हजारांच्याही पुढे गेली आहे. एप्रिल महिन्यातही ही वाढ कायम राहिली आहे. मागील चार दिवसांत दर दिवशी १३ हजारांहून अधिक नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.

 मुंबईत मार्चच्या पहिल्या आठवडय़ात वर्धक मात्रा घेणाऱ्या नागरिकांची संख्या दैनंदिन सुमारे ८०० पर्यंत होती. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ापासून वर्धक मात्रेच्या लसीकरणाने पुन्हा वेग घेतला. मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात वर्धक मात्रेच्या लसीकरणाचे दैनंदिन प्रमाण अडीच हजारांपर्यंत गेले आहे. एप्रिलमध्ये ही वाढ कायम राहिली असून दोन हजारांहून अधिक नागरिक दरदिवशी वर्धक मात्रा घेत आहेत.  राज्यभरात  १९ लाख ५ हजार जणांनी वर्धक मात्रा घेतली आहे. यात ६० वर्षांवरील १२ लाख १० हजार नागरिकांचा समावेश आहे, तर ३ लाख ३६ हजार आरोग्य कर्मचारी आणि ३ लाख ५९ हजार अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आहेत.

साठ वर्षांवरील अनेक नागरिकांचे लस घेऊन नऊ महिने पूर्ण झालेले नव्हते. मार्चमध्ये हे नऊ महिने पूर्ण झाल्यामुळे हे नागरिक वर्धक मात्रा घेत आहेत. तसेच काही नागरिकांना जानेवारीमध्ये आलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये करोनाची बाधा झाली होती. आता तीन महिने उलटल्याने तेही वर्धक मात्रेसाठी पात्र आहेत. मुखपट्टीसह अनेक निर्बंध उठविल्यामुळे काही ज्येष्ठ काळजीपोटी वर्धक मात्रा घेण्यास येत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत याचा प्रतिसाद वाढल्याचे दिसून येते असे राज्य लसीकरण विभागाचे प्रमुख डॉ. सचिन देसाई यांनी सांगितले.

मुंबईत अधिक संख्या

 ६० वर्षांवरील नागरिकांमध्ये वर्धक मात्रा घेणारे सर्वाधिक २ लाख ७६ हजार नागरिक हे मुंबईतील आहेत. त्या खालोखाल पुणे आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात वर्धा, वाशिम, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, परभणी, जालना, हिंगोली, गोंदिया येथे वर्धक मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण नऊ हजारांच्याही खाली आहे. गडचिरोलीमध्ये तर १,७०० नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे. ११ टक्के नागरिकांना वर्धक मात्रा राज्यभरात लशीच्या दोन्ही मात्रा पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठांची संख्या १ कोटी १० लाख आहे. वर्धक मात्रेसाठीचा प्रतिसाद वाढत असला तरी अडीच महिन्यात ६० वर्षांवरील ११ टक्के नागरिकांनीच वर्धक मात्रा घेतली आहे, असे यावरून निदर्शनास येते.