मुंबई : जगातील सहापैकी एक जीवाणू संसर्गावर प्रतिजैविकांचा परिणाम होत नसल्याची धक्कादायक बाब जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केली आहे. २०१८ ते २०२३ या कालावधीत जीवाणूंमधील प्रतिकारक्षमता तब्बल ४० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. भारतामध्ये प्रतिजैविकांच्या प्रतिरोधकाचा (सुपरबग्स) धोका वाढत असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल अँटीबायोटिक रेझिस्टन्स सर्व्हेलन्स (ग्लास) अहवालानुसार, भारतासारख्या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ही समस्या सर्वात वेगाने वाढत आहे. हा अहवाल १०० हून अधिक देशांमधील २३ दशलक्षाहून अधिक जिवाणू संसर्गाच्या माहितीवर आधारित आहे. २०१८ ते २०२३ दरम्यान रक्त, मूत्रमार्ग, आतडे आणि प्रजनन प्रणालीवर परिणाम करणाऱ्या सामान्य संसर्गांविरुद्ध ४० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिजैविकांचा प्रभाव कमी झाला आहे. जगामध्ये २०२१ मध्ये ७.७ दशलक्ष नागरिकांचा मृत्यू जीवाणूंच्या संसर्गामुळे झाला आहे.

प्राणघातक औषध-प्रतिरोधक जीवाणूंची २०२१ मध्ये सुमारे १०.७ लाख भारतीयांना लागण झाल्याचे ‘द लॅन्सेट’ अहवालामध्ये म्हटले आहे. यापैकी ८ टक्क्यांपेक्षा कमी रुग्णांना आवश्यक असलेले उपचार मिळाले, तर अतिदक्षता विभागात (आयसीयू) सुमारे ३० टक्के रुग्ण प्रतिजैविकांना प्रतिसाद न देणारे होते. यापैकी बहुतेक संसर्ग कार्बापेनेम-प्रतिरोधक ग्राम-निगेटिव्ह जीवाणूंमुळे झाले होते. भारतात २०१९ मध्ये ३ लाख ते १०.४ लाख मृत्यू बॅक्टेरियाच्या एएमआरशी संबंधित होते, असे ग्लोबल रिसर्च ऑन अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स प्रोजेक्टच्या जागतिक अहवालात म्हटले आहे.

अँटीबायोटिक्सच्या अतिवापरामुळे समस्या

भारतात औषध प्रतिकारोधकाची लाट येण्यामागे अनेक कारणे आहेत. यामध्ये अँटीबायोटिक्सचा अतिवापर आणि गैरवापर, सबळ संसर्ग नियंत्रण कार्यक्रमांचा अभाव, निकृष्ट औषधे आणि देखरेखीतील त्रुटींचा समावेश आहे.

रुग्णालयांमध्ये सर्वाधिक सुपरबग्सचा उदय

देशातील सुपरबग्स पर्यावरणीय दबावामुळे विकसित होत नसून, बहुतेक रुग्णालयांमध्ये उदयास येत असल्याचे संशोधनातून उघडकीस आले आहे. क्लेब्सिएला न्यूमोनिया हा जीवाणू न्यूमोनियापासून मूत्रमार्ग आणि यकृताच्या संसर्गापर्यंत विविध प्रकारच्या संसर्गांसाठी कारणीभूत ठरतो. त्याने औषध प्रतिरोधकता विकसित केली आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेने आता या जीवाणूची उच्च प्रतिकारशक्ती आणि इतर जीवाणूंना तो प्रतिकार हस्तांतरित करण्याची क्षमता यामुळे गंभीर प्राधान्य रोगजनक म्हणून यादी केली आहे. ही समस्या जागतिक असली तरी भारतासारख्या देशांमध्ये संसाधनांचा अभाव असल्याने त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे.