मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनद्वारे (आयआरसीटीसी) श्रावण विशेष आध्यात्मिक सहली सुरू केल्या आहेत. आयआरसीटीसीद्वारे मुंबई, पुण्यातून द्वारका-सोमनाथ, महाकालेश्वर – ओंकारेश्वर, काशी विश्वनाथ – वैजनाथ या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही पूर्ण सहल हवाई मार्गे होणार आहे.

भारत सरकारच्या ‘देखो अपना देश’ आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाच्या अनुषंगाने, देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत गौरव टूरिस्ट ट्रेन चालवण्यासाठी पुढाकार घेतला. आता विमान सेवेने आध्यात्मिक ठिकाणी सहलीचे आयोजन केले आहे. सहलीची सुरुवात मुंबई आणि पुण्यातून होईल. त्यानंतर द्वारका-सोमनाथ, महाकालेश्वर – ओंकारेश्वर यांसारख्या पवित्र आध्यात्मिक स्थळांना भेटी देता येतील. तसेच काशी विश्वनाथ – वैजनाथ याठिकाणी दौरा होईल. संपूर्ण प्रवास अधिक सोयीस्कर, आनंददायी आणि परवडणारा करण्याचे आयआरसीटी प्रयत्नशील आहे. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबियांच्या खर्चाचा विचार करून, त्यांच्या आवाक्यात या सहलीचे नियोजन केले आहे, असे आयआरसीटीसीच्या पश्चिम विभागाचे समूह महाव्यवस्थापक गौरव झा यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सहली कधी आणि कशा?

द्वारका, सोमनाथ येथील सहल ३१ जुलै आणि १४ ऑगस्ट रोजी मुंबईतून मार्गस्थ होईल तर १० ऑगस्ट रोजी पुण्यातून सुरू होईल. ३ रात्री, ४ दिवस असा सहलीचा कालावधी असेल. दोन जणांसाठी सामाईक सुविधा (शेअरिंग) असतील. सहलीचा खर्च प्रति व्यक्ती २६,७०० रुपये असेल. महाकालेश्वर, ओंकारेश्वर येथील सहल मुंबई आणि पुण्यातून १४ ऑगस्ट रोजी सुरू होईल. ३ रात्री ४ दिवस असा सहलीचा कालावधी असेल. दोघांसाठी सामाईक सुविधांसह प्रति व्यक्ती २८,५०० रुपये खर्च येईल. काशी विश्वनाथ, बैद्यनाथ दौरा मुंबईतून ७ ऑगस्ट रोजी सुरू होईल. २ रात्री ३ दिवस असा सहलीचा कालावधी असेल. दोघांसाठीच्या सामाईक सुविधांसह प्रति व्यक्ती २८ हजार रुपये खर्च येईल. परतीचे विमान तिकिटे, जेवण, प्रवेश शुल्क, निवास शुल्क, प्रवास विमा आणि जीएसटी या सर्वांचा खर्च एकत्रित घेतला गेला आहे, अशी माहिती आयआरसीटीसीद्वारे देण्यात आली.