मुंबई : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनचे (आयआरसीटीसी) संकेतस्थळ आणि मोबाइल ॲपवरून ऑनलाइन तिकीट आरक्षित करताना पहिल्या १५ मिनिटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. आधार प्रमाणीकरण केवळ सामान्य आरक्षण सुरू होण्याच्या पहिल्या १५ मिनिटांपुरतेच लागू असेल, हा नियम १ ऑक्टोबरपासून लागू होईल.

आयआरसीटीसीचे संकेतस्थळ किंवा मोबाइल ॲपवरून तिकीट काढण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सामान्य आरक्षित तिकिटांचे आरक्षण सुरू होण्यापूर्वी १० मिनिटांच्या मर्यादित वेळेत कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट दलालांना सुरुवातीच्या दिवसाची तिकिटे आरक्षित करण्याची परवानगी मिळणार नाही. संगणकीकृत पीआरएस खिडकीद्वारे सामान्य तिकिटांच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल होणार नाही, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, ऑनलाइन तिकिट प्रणालीचा गैरवापर टाळण्यासाठी आणि या प्रणालीचे लाभ सामान्य प्रवाशांपर्यंत पोहचावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तिकिट नियमांतील बदल लक्षात घेऊन त्यानुसार तिकिट आरक्षित करण्याची योजना आखावी, असे आवाहन मध्य रेल्वेने प्रवाशांना केले आहे.

तिकीट काढताना गडबड

भारतीय रेल्वेवरील नियमित रेल्वे गाड्यांसह विशेष रेल्वे गाड्यांची तिकिटे आरक्षित करण्यास प्रचंड कसरत करावी लागते. प्रतीक्षा यादीतील तात्काळ तिकिटे मिळत असल्याने प्रवाशांना रेल्वे प्रवासापासून वंचित राहावे लागते. भारतीय रेल्वेमध्ये तात्काळ तिकीट काढताना गडबड होत असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. एका सर्वेक्षणानुसार, गेल्या १२ महिन्यांत ऑनलाईन तात्काळ तिकिटे आरक्षित करण्यात अडचणी आल्याचे मत १० पैकी ७ जणांनी व्यक्त केले. तात्काळ तिकिटाचे आरक्षण सुरू झाल्यानंतर काही मिनिटांत तिकिटे प्रतीक्षा यादीत जातात, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले.

ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य

भारतीय रेल्वेचे तत्काळ तिकीट काढण्यात गोंधळ होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. तात्काळ तिकिटांचे आरक्षण सुरू केल्यानंतर एका मिनिटात सर्व तिकिटे आरक्षित होतात. परिणामी, तात्काळ सुविधेचा कोणताही लाभ सर्वसामान्य प्रवाशांना होत नाही. त्यामुळे रेल्वे मंडळाने त्याबाबत ठोस पावले उचण्यास सुरुवात केली आहे. तत्काळ तिकिटे काढण्यास सुरुवात झाल्यानंतर ती ३० मिनिटांच्या कालावधीपर्यंत आरक्षित होणार नाहीत. यासह १ जुलै २०२५ पासून फक्त आधार प्रमाणित वापरकर्त्यांना आयआरसीटीसीच्या संकेतस्थळ आणि ॲपद्वारे तत्काळ तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. तर, १५ जुलै २०२५ पासून तत्काळ तिकीट काढण्यासाठी आधार आधारित ”ओटीपी” प्रमाणीकरण देखील अनिवार्य करण्यात येणार आहे.