मुंबई : मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेल्या बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागातील स्वमालकीच्या बसगाड्या निवृत्तीकडे झुकल्या असून एकेक बसगाडी ताफ्यातून निवृत्त होऊ लागली आहे.
गोराई आगारातील अशोक लेलँड जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गतची बसगाडी क्रमांक १९४२ ने नुकताच मुंबईकरांचा निरोप घेतला. आता २५ ऑक्टोबर रोजी बेस्ट बस क्रमांक १८६४ ची बस सेवानिवृत्त होत आहे. या बसलाही समारंभपूर्वक निरोप देण्यात येणार आहे.
बेस्ट उपक्रमातील १५ वर्षांचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बसगाड्या भंगारात काढण्यात येतात. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गत बेस्टच्या ताफ्यात दाखल झालेली अखेरची बस क्रमांक १८६४ सेवानिवृत्त होत आहे. यानंतर नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण अभियानाअंतर्गतमधील बसचे पर्व संपणार आहे. गोराई आगारातून धावणारी बस क्रमांक १९४८ ही १३ ऑक्टोबर आणि बस क्रमांक १९४९ ही १७ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त झाली. त्यामुळे बेस्टच्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसगाड्या कमी होणार असून भविष्यात प्रवाशांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत.
मालवणी आगारातील बस क्रमांक १८६४ ला १५ वर्ष पूर्ण झाली असून आता या बसचे २५ ऑक्टोबरपासून रस्त्यावर धावणे कायमचे बंद होणार आहे. बसची शेवटची फेरी बेस्ट मार्ग क्रमांक २०७ वरून चालवण्याचे नियोजन आहे. या बसची सेवा बंद झाल्यास भांडुप येथील काही मार्गावरील स्वमालकीची बस धावणे कायमस्वरूपी बंद होण्याची चिन्हे आहेत.
मुंबईच्या भौगोलिक रचनेनुसार, रेल्वे सेवा ही उत्तर-दक्षिण दिशेने धावते. तसेच नव्याने सुरू झालेली मेट्रो -३ ची सेवा देखील अशाप्रकारे धावत आहे. परंतु, मुंबईमधील सर्व भागांना जोडण्याचे आणि प्रामुख्याने पूर्व-पश्चिम मुंबईला जोडण्याचे काम बेस्ट बस करते. त्यामुळेच मुंबईकरांची रस्ते मार्गावरील ‘जीवनवाहिनी’ म्हणून बेस्ट बस ओळखली जाते.
मार्च २०२६ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या २३५ बस शिल्लक राहतील. त्यानंतर मार्च २०२७ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीचा ताफा उरणार नाही. त्यामुळे प्रवाशांना मिळणारी स्वस्तातील सुविधा बंद होण्याची शक्यता आहे.