मुंबई: जोगेश्वरी मध्ये बांधकाम सुरू असेलल्या इमारतीमधून सिमेंटची वीट पडून खालून जाणार्या २२ वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी संबंधित इमारतीच्या दोन अभियंत्यांना अटक केली आहे. सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्याचे ठपका ठेवून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

नेमकी घटना काय?

संस्कृती अमीन (२२) ही तरूणी जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आई वडिलांसह रहात होती. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. नुकतीच ती एका खासगी बॅंकेत कामाला लागली होती. बुधवारी ८ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जाण्यासाठी निघाली होती. मजासवाडीच्या धोबीघाट परिसरात श्रध्दा लाईफ स्टाईल एलएलपी या कंपनीतर्फे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संस्कृती याच इमारतीच्या खालून जात होती. त्यावेळी साडेनऊच्या सुमारास या इमारतीवरून सिमेंटची वीट (ब्लॉक) संस्कृतीच्या डोक्यावर पडली. ती बेशुध्द होऊन खाली पडली. तिला उपचारासाठी जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मयत घोषीत केले. वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने संस्कृतीचा मृत्यू झाला होता.

गुन्हा दाखल

बांधकाम सुरू असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक होते. मात्र ते केल्याचे दिसून आले नाही. याबाबत मयत संस्कृतीचे वडील अनिल अमिन यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. याप्रकरणी श्रध्दा लाईफ स्टाईल एलएलपी या कंपनीशी संबधित विकासक, ठेकेदार, पर्यवेक्षक आदींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ आणि ३ (५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दोघांना अटक

या घटनेप्रकरणी मेघवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. शनिवारी पोलिसांनी साईट अभियंता शंभू कुमार पलट पासवान ( २९) आणि गौरव दिनेशभाई सोनडगर ( ३९) या दोघांना अटक केली. त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी तपास सुरू असून या दुर्घटनेला जबाबदार असणार्या आणखी काही जणांना अटक होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.