मुंबई : करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारीचा वेग वाढवला आहे. पालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रियागृह, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग आदी सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत.
मुंबईसह राज्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमी राज्यकृती दलाने नुकतीच आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये सर्व रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या धर्तीवर शुक्रवारी मुंबई महापालिकेने आढावा बैठक घेतली. बैठकीमध्ये पालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी, सर्व रुग्णालयांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी रुग्णांसाठी उपलब्ध खाटा, औषधे, प्राणवायूचा साठा याचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय आणि अन्य एका ठिकाणी जम्बो करोना केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांसाठी रक्तशुद्धीकरण केंद्र, शस्त्रक्रियागृह, लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग, करोना चाचणी करण्याची सुविधा, रेमेडेसिविर इंजेक्शन, प्राणवायूचा साठा सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. सध्या सेव्हन हिल्स रुग्णालयात १८५०, तर कस्तुरबा रुग्णालयात ३० खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. तसेच सेव्हन हिल रुग्णालयामध्ये रेमेडेसेविर इंजेक्शन साठा उपलब्ध असून, अन्य रुग्णालयांना आढावा घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
लक्षणे असलेल्या प्रत्येक रुग्णांची करोना चाचणी करणे, उपलब्ध प्राणवायूच्या साठय़ाचा आढावा घेऊन रिक्त असलेले सिलिंडर तातडीने भरून घ्यावेत, औषधांचा साठा मागविण्यात यावा, करोनाची लक्षणे असलेल्या प्रत्येक रुग्णाची करोना चाचणी करावी, करोनाचा रुग्ण आढळल्यास त्याचे तातडीने अलगीकरण करण्याच्या सूचना रुग्णालयांना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालिका रुग्णालय संचालक व प्रमुख डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.
मुखपट्टी बंधनकारक
वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांच्यासह रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना रुग्णालयामध्ये मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जागरूकता करण्यावर भर देण्याची सूचनाही रुग्णालय प्रशासनाला या बैठकीमध्ये करण्यात आली.
राज्यात करोनाचे ४२५ नवे रुग्ण
राज्यातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, शुक्रवारी राज्यामध्ये ४२५ नवे रुग्ण सापडले. तर उपचाराधीन रुग्णांची संख्या ३०९० वर पोहोचली. सध्या मृत्युदर १.८२ टक्के आहे.
संसर्गदरात ५ टक्क्यांनी वाढ
करोना चाचणी सकारात्मक येण्याच्या दरात ५ टक्क्यांनी वाढ झाली असून, राज्यातील रुग्ण चाचणीचा सकारात्मक दर चार आठवडय़ांपूर्वी १.०५ टक्के इतका होता. तर, २२ ते २८ मार्चदरम्यान तो ६.१५ टक्के झाला आहे. यामध्ये सोलापूरमध्ये सर्वाधिक २०.०५ टक्के, सांगली १७.४७ टक्के, कोल्हापूर १५.३५ टक्के, पुणे १२.३३ टक्के, नाशिक ७.८४ टक्के आणि अहमदनगर ७.५६ टक्के इतका आहे.
राज्यात ‘एच ३ एन २’चे १२ नवे रुग्ण
मुंबई : राज्यामध्ये शुक्रवारी ‘एच ३ एन २’च्या १२ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे ‘एच ३ एन २’च्या रुग्णांची संख्या ३५८ झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे ३ लाख ५८ हजार ०७३ संशयित रुग्ण सापडले असून त्यांना ऑसेलटॅमीवीर हे औषध देण्यात आले आहे. यामध्ये ‘एच १ एन १’चे ४५१ तर ‘एच ३ एन २’चे ३५८ रुग्ण आढळून आले आहेत.
‘एक्सबीबी.१.१६’ या विषाणूचे २३० रुग्ण
राज्यात एक्सबीबी.१.१६ या विषाणूचे २३० रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी पुण्यात १५१, औरंगाबादमध्ये २४, ठाण्यात २३, मुंबईत १, कोल्हापूरमध्ये ११, अमरावतीत ८, अहमदनगरमध्ये ११, रायगडमध्ये १ रुग्ण आहे. यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून उर्वरित रुग्ण बरे झाले आहेत. या भागात सर्वेक्षण करून अधिक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रुग्णांच्या तपासणीसाठी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष
चाचणी केल्याशिवाय करोनाची लागण झाल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी व चाचणी करण्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये विशेष कक्ष उभारण्यात येणार आहे. जेणेकरून प्रसार रोखण्यास मदत होईल, अशी माहिती डॉ. नीलिमा अंद्राडे यांनी दिली.
महत्त्वाच्या सूचना
- सर्व रुग्णालयांमध्ये करोना चाचणी करावी
- रुग्णालयांमध्ये मुखपट्टी बंधनकारक
- प्राणवायूचा पुरेसा साठा उपलब्ध करावा
- प्राणवायू प्रकल्पांची क्षमता तपासून निर्मितीवर भर
- जीवन रक्षक प्रणाली कार्यरत असल्याची तपासणी