मुंबई: एका तरुणाने २४ वर्षीय प्रेयसीवर चाकूने हल्ला करून नंतर आत्महत्या केल्याची घटना काळाचौकी परिसरात शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. भर दिवसा गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळे काळाचौकी परिसरात एकच खळबळ उडाली. सोनू बराई असे या घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावरून हे दोघे चालत येत होते. त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. अचानकपणे त्या तरुणाने आपल्या खिशातील चाकू काढला आणि तरुणीवर हल्ला केला. ती तरुणी जीव वाचवण्यासाठी जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये गेली. सोनू तिच्या मागे गेला आणि तिच्यावर चाकूने वार केले. यानंतर त्याने स्वतःवरही चाकूचे वार केला.
या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या सोनूचा मृत्यू झाला. तरुणीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. दोघांचे प्रेम संबंध होते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांचे संबंध तुटले होते. त्यावरून संतापलेल्या तरुणाने हा हल्ला केला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
