मुंबई : दक्षिण मुंबईतील कामाठीपुराच्या प्रत्यक्ष पुनर्विकासाला येत्या काही महिन्यात सुरुवात करण्याचे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे नियोजन आहे. त्यानुसार बांधकामासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी (सी अँड डी) अर्थात खासगी विकासकाची नियुक्ती करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तर दुसरकीडे दुरुस्ती मंडळाने आता कामाठीपुरातील अंदाजे आठ हजार सदनिकांतील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणास वेग दिला आहे. आतापर्यंत २५०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित सर्वेक्षण येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्याचे दुरुस्ती मंडळाचे उद्दिष्ट आहे.

कामाठीपुरा परिसरातील अंदाजे ३४ एकरावर ४७५ उपकरप्राप्त इमारती, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती,१५ पुनर्बांधणी केलेल्या इमारती, ५२ कोसळलेल्या इमारती यासह अन्य प्रकारची बांधकामे आहेत. तर येथील निवासी रहिवाशांची संख्या ६०७३, तर अनिवासी रहिवाशांची संख्या १३४२ अशी आहे. कामाठीपुरातील या सर्व इमारतींची पुरती दुरावस्था झाली असून दुसरीकडे त्यांचा पुनर्विकास रखडला होता. कोणी विकासक पुनर्विकासासाठी पुढे येत नव्हता. शेवटी दुरुस्ती मंडळाने या परिसराच्या पुनर्विकासाची जबाबदारी स्वीकारली आणि पुनर्विकासाची कार्यवाही वेगात सुरू केली. काही महिन्यांपूर्वीच पुनर्विकासासाठी खासगी विकासकाची नियुक्ती करण्याकरीता दुरुस्ती मंडळाने निविदा मागविल्या होत्या. त्यानुसार दोन कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या असून येत्या काही दिवसातच निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. निविदा अंतिम झाल्यास त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे. राज्य सरकारची मान्यता मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करून घरे रिकामी करुन घेणे, घरभाडे अदा करणे आणि त्यानंतर भूखंड रिकामा करणे अदी कामांना मंडळाकडून सुरुवात होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. एकीकडे निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना आता दुसरीकडे दुरुस्ती मंडळाने कामाठीपुरातील रहिवाशांच्या बायोमेट्रीक सर्वेक्षणाला वेग दिला आहे.

कामाठीपुरातील इमारतींची, बांधकामांची आणि रहिवासी संख्येचे माहिती मंडळाकडे आहे. मात्र तरीही सध्या तिथे कोण वास्तव्यास आहे आणि अंतिमत रहिवाशांची, बांधकामांची संख्या किती आहे हे नव्याने तपासण्यासाठी महिन्याभरापूर्वी बायोमेट्रीक सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. एका खासगी कंपन्यांच्या सहकार्याने दुरुस्ती मंडळ बायोमेट्रीक सर्वेक्षण करीत असून आतापर्यंत आठ हजारपैकी २५०० रहिवाशांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. येत्या काही महिन्यांत १०० टक्के बायोमेट्रीक सर्वेक्षण पूर्ण करून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून विकासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून पुनर्विकासाअंतर्गत पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्यात येईल,असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.