मुंबई : यूट्यूबवर जाहिरात पाहून गुंतवणूक करणाऱ्या कांदिवलीतील पिता-कन्येला सायबर ठकसेनांनी तब्बल ९ लाख रुपयांना गंडा घातला. गुंतवणूक केल्यास दुप्पट रकमेचा परतावा देण्यात येईल असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात ही कंपनी बोगस निघाली. याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कांदिवलीत राहणारे फिर्यादी ५७ वर्षीय विनोद मेहता (नाव बदलेले) यांनी २० मार्च २०२५ रोजी युट्यूबवर ब्लिंकएक्स-प्रो नावांच्या कंपनची जाहिरात पाहिली होती. या कंपनीने आमच्या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कमेचा आर्थिक फायदा होईल असा दावा केला होता. मेहता या जाहिरातीला बळी पडले. त्यांनी त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. हा नंबर निनाद कदम नावाच्या व्यक्तीचा होता. कंपनीने सांगितलेल्या शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास दुप्पट पैसे मिळतील असे त्याने मेहता यांना आश्वासन दिले. मेहता यांचा त्याच्यावर विश्वास बसला.

अशी केली फसवणूक

मेहता जाळ्यात फसल्यानंतर आरोपींनी त्यांची टप्प्याटप्प्याने फसवणूक करण्यास सुरवात केली. मेहता यांना ब्लिंकएक्स-प्रो नावाचे ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले आणि एका व्हॉट्स ॲप समूहात सहभागी करून घेतले. त्या समूहात रिध्दी शहा नावाची महिला होती. रिध्दी शहा या महिलेने मेहता यांच्याशी संपर्क साधला. कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, कोणते शेअर्स घ्यावे याबाबत तिने सल्ला दिला. त्यासाठी मेहता तयार झाले. मेहता यांनी २१ मार्च रोजी एका खात्यावर २० हजार रुपयांची, तर दुसऱ्या खात्यावर ६ हजार ५०० रुपयांची गुंतवणूक केली. मेहता यांनी केलेल्या गुंतवणुकीवर फायदा झाला असल्याचे ॲपवर दाखविण्यात आले. त्यामुळे फिर्यादी मेहता यांचा विश्वास बसला. मेहता यांनी त्यांच्या मुलीलाही गुंतवणूक करण्यास सांगितले. मेहता आणि त्यांची मुलगी या कंपनीच्या सूचनेनुसार गुंतवणूक करू लागले.

नफा झाला पण…

मेहता पिता-पुत्रीने केलेल्या गुंतवणुकीच्या रकमेवर ८ लाख ८४ हजार रुपये नफा दिसत होता. त्यामुळे त्यांनी हा रक्कम काढण्याचे ठरवले. परंतु त्यांना ही रक्कम काढायाची असल्यास २ लाख ४५ हजार रुपये सेवा शुल्क (सर्व्हिस चार्ज) भरावे लागेल असे सांगण्यात आले. त्यानुसार १४ मे रोजी त्यांनी अडीच लाख रुपये सेवा शुल्क भरले. परंतु सायबर ठकसेनांनी त्यांना आणखी एक अडचण सांगितली. रक्कम काढायची असल्यास १ लाख ५७ हजार ४७३ रुपये प्राप्तीकराच्या (इन्कम टॅक्स) स्वरूपात भरावे लागतील असेही त्यांना सांगण्यात आले.

मेहता यांचा नाईलाज होता. त्यामुळे त्यांनी ते पैसे देखील भरले. आता तरी आपले ८ लाख मिळतील असे त्यांना वाटले. पण सायबर ठकसेनांनी त्यांच्याकडे पुन्हा १ लाख २० हजार रुपये मागितले. त्यावेळी मात्र मेहता यांना संशय आला. त्यांनी कंपनीच्या कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन माहिती घेण्याचे ठरवले. मेहता अंधेरी येथील कंपनीच्या नमूद पत्त्यावर गेले. परंतु तेथे ब्लिंकिसएक्स नावाची मूळ कंपनी होती. सायबर भामट्यांनी मात्र त्याच नावाचा आधार घेत ब्लिंकिसएक्स-प्रो या नावाची कंपनी असल्याचे दाखवून फसवणूक केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रकार लक्षात येईपर्यंत सायबर ठकसेनांच्या जाळ्यात फसून मेहता यांनी स्वत:च्या खात्यातील ८ लाख ८४ हजार, तर मुलीच्या खात्यातून ९५ हजार रुपये गमावले होते. त्यांची एकूण ९ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याबाबत त्यांनी सुरवातीला सायबर पोलिसांच्या १९३० या मदत क्रमांकावर आणि नंतर कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कांदिवली पोलिसांनी याप्रकरणी निनाद कदम आणि रिध्दी शहा यांच्याविरोधात महिती तंत्रज्ञान अधिनिमयाच्या कलम ६६ (सी), ६६ (डी), तसेच फसवुकीप्रकरणी कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.