मुंबई : पूर्व उपनगरातील कांजूरमार्ग परिसरातील महापालिकेच्या कचराभूमीतून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येत असून याप्रकरणी योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी पुन्हा एकदा रहिवाशांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणीमहाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि महापालिकेकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र परिस्थिती ‘जैसे थे’च आहे.
मागील दोन महिन्यांपासून कांजूरमार्ग कचराभूमीतून येणाऱ्या दुर्गंधीप्रकरणी स्थानिक रहिवासी वारंवार पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी करीत आहेत. मात्र, याकडे कानाडोळा करण्यात येत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी कांजूरमार्ग येथील कचराभूमीच्या ११९.९१ हेक्टर क्षेत्राला उच्च न्यायालयाने पुन्हा संरक्षित वन म्हणून घोषित केले. त्यामुळे कचरा विल्हेवाटीसाठी पर्यायी जागा निश्चित करण्यासाठी न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला तीन महिन्यांची मुदत दिली आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे कांजूरमार्ग, भांडूप आणि विक्रोळी येथील रहिवासी त्रस्त आहेत. नागरिकांना दररोज दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. लहान मुले, वृद्धांनाही सकाळी फिरायला किंवा रात्री जेवणानंतर बाहेर पडणे कठिण झाले आहे.
अनेकदा तक्रारी करूनही यावर तोडगा काढला जात नसल्याने रहिवासी संतप्त झाले आहेत. यापूर्वी याप्रकरणी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला कायदेशीर नोटीस पाठविण्यात आली होती. तसेच राज्य सरकारचा नगर विकास विभाग, पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नोटीस पाठवली होती. तरीही याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
डास वाढण्याची शक्यता
कचरा टाकण्यात येत असलेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात डास आणि किटक वाढण्याची शक्यता आहे. सतत दुर्गंधी येत असल्यामुळे श्वासोच्छवासाचाही त्रास होऊ शकतो. यामुळे मळमळ, सतत उलट्याही होऊ शकतात.
गेले काही महिने या दुर्गंधीचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. अनेक तक्रारी करूनही यावर तोडगा निघालेला आहे. काही दिवसांनी दुसऱ्या जागी कचऱ्याची विल्हेवाट करण्यात येणार असली तरी सध्या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे त्याचे काय ? – स्टॅलिन डी, पर्यावरणप्रेमी, रहिवासी.