मुंबई : मध्य रेल्वेने कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लाॅक घेऊन कर्जत येथे रूट रिले इंटरलॉकिंग (आरआरआय) प्रणाली आणि पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले. या प्रणालीमुळे मध्य रेल्वेच्या आधुनिकरण व कार्यक्षमतेत सुधारणा झाल्या आहेत. या ७४.५३ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद होईल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

कर्जत – पळसदरीदरम्यान नवीन चौथी मार्गिका सुरू करण्यात आली. या नवीन मार्गिकेमुळे लोकल सेवेची वाहतूक सुधारण्यास मदत होईल. खोपोली मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा मुख्य घाट विभागापासून वेगळी करण्यात आली आहे. त्यामुळे परस्परविरोधी रेल्वे वाहतूक सेवेचे चक्र सुधारून, रेल्वे सेवा अधिक सुरक्षित झाली आहे.

सिग्नलिंग आधुनिकीकरणाबरोबरच मोठ्या प्रमाणात पायाभूत आणि विद्युत कामे करण्यात आली. ब्लाॅक कालावधीत आठ पूल, दोन पादचारी पुलांचे विस्तारीकरण करण्यात आले. ४.९ किमी नवीन रेल्वे मार्गाची जोडणी केली. ९ किमी रेल्वे मार्गावर नवीन ओव्हर हेड वायर टाकण्यात आली आहे. यार्डचे पूर्ण विद्युतीकरण करण्यात आले. यामुळे आता रेल्वे सेवेची क्षमता २५ टक्क्यांनी वाढली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.