मुंबई : कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून आत्महत्या कण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद आफ्रिद असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल होता. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी सहार पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा >>> भविष्यात मुंबईला पाच वातावरणीय धोके; उष्णता, पूर, वायू प्रदूषण अशा धोक्यापासून मुंबईला वाचवण्यासाठी पालिकेचा कृती आराखडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील इमिग्रेशन अधिकारीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ३ जून रोजी घडली. येथील एका महिला अधिकाऱ्याने सकाळी १० च्या सुमारास दुबईतून मुंबईत आलेला प्रवासी मोहम्मद आफ्रिद याला अडवले. कर्नाटकातील सिध्दापुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोहम्मद आफ्रिद हा पाहीजे आरोपी असून कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. तपासात मोहम्मद आफ्रिद हा तोच आरोपी असल्याचे स्पष्ट झाल्याने तक्रारदारांनी त्याला इमिग्रेशन विंग इनचार्ज यांच्या चौकशी कक्षात बसवून ठेवले. मोहम्मद आफ्रिद याला सहार पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू असतानाच ११.३० च्या सुमारास त्याने स्वतः जवळील धारदार वस्तूने डाव्या हाताच्या मनगटाची नस कापली. जखमी मोहम्मद आफ्रिद याच्यावर प्राथमिक उपचार करून तातडीने पुढील उपचारांसाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. कूपर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आल्यानंतर तक्रारदारांनी सहार पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. याप्रकरणी आफ्रिदविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.