भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नवाब मलिक आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय. समीर वानखेडे यांच्यावर महाविकास आघाडीचा एक कॅबिनेट मंत्री मागील १२ दिवसांपासून चिखलफेक करत आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला. तसेच वानखेडे यांच्याविरोधात पुरावे आहेत तर मग मलिक, ठाकरे आणि पवार मुंबई उच्च न्यायालयात गप्प का बसले? असा सवाल सोमय्यांनी केला.

किरीट सोमय्या म्हणाले, “१२ दिवस महाविकासआघाडीचा कॅबिनेट मंत्री एवढा चिखल उडवतोय. त्या क्रुझबाबत पैशांचा व्यवहार झाला असेल तर उच्च न्यायालयात याविषयी याचिका दाखल आहे. शाहरूख खानने नकार दिला तर नवाब मलिक, उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांनी प्रतिज्ञापत्र दाखल करायला हवं होतं. अशाप्रकारे चिखलफेक करून एखाद्याचं व्यक्तिगत आयुष्य बिघडवून त्यांना काय साधायचं आहे? देव त्यांना क्षमा करो.”

“पवारांनी पेड मीडियाचा वापर करून आयटी-ईडी कारवाईची चर्चा वानखेडेंवर नेली”

“शरद पवार यांनी पेड मीडियाचा वापर करून माध्यमातील चर्चा समीर वानखेडे दलित आहेत की मुस्लीम आहेत यावर नेली. परंतू आम्ही घोटाळेबाजांना सोडणार नाही. आयकर विभागानंतर ईडी चौकशी करत होती. आम्हीही अनेक पुरावे दिले होते. आयटीला देखील अनेक गोष्टी सापडल्या. १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती प्रकरणी आता ईडी पण मागे लागलीय,” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे कारखाने हडपले”

किरीट सोमय्या यांनी यावेळी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावरही आरोप केले. ते म्हणाले, “मी लातूरनंतर आता नांदेडला जाणार आहे. लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांचे कारखाने हडप करण्याची मोहिम सुरू केली त्याविषयी माझ्याकडे कागदपत्रे आहेत. सोमवारी (१ नोव्हेंबर) लातूरचे भाजपा आमदार संभाजीराव निलंगेकर यांच्यापासून अन्य लोकांसोबत आम्ही ईडीकडे तक्रार दाखल करणार आहे. ईडीला कागदपत्रे आणि पुरावे देणार आहोत.”

“सर्व पुरावे आहेत, तर ते मुंबई उच्च न्यायालयात गप्प का बसले?”

“शरद पवार, उद्धव ठाकरे, नवाब मलिक यांच्याकडे हे सर्व पुरावे आहेत, तर ते मुंबई उच्च न्यायालयात गप्प का बसले आहेत? असा प्रश्न महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोक विचारत आहेत. त्यांना केवळ विषय बदलायचा आहे. अजित पवार यांच्यावर ११ दिवस आयटीची धाड सुरू होती, आता ईडीची सुरू झालीय. या विषयावरून लक्ष हटवण्यासाठी त्यांचं नाटक सुरू आहे,” असा आरोप सोमय्यांनी केला.

हेही वाचा : “अजित पवार यांच्यात हिंमतच नाही”, जरंडेश्वर साखर कारखान्यातील भ्रष्टाचारावरून किरीट सोमय्यांचा निशाणा

“नवाब मलिक सकाळपासून संध्याकाळपर्यंत समीर वानखेडे तू दलित नाही, मुस्लीम आहेत, हिंदू नाही, मुस्लीम आहे असं एकच वाक्य बोलत आहेत. काय नाटक लावलंय? एनसीबी ड्रग माफियांचा शोध घेत आहेत आणि हे तो विषय दुसरीकडे नेत आहेत,” असंही किरीट सोमय्या म्हणाले.