मुंबई : कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्यांत कापणीला आलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या मदत निधीत कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश नाही. त्यामुळे नुकसान झालेल्या भात पिकांचे तातडीने पंचनामे करून भरीव मदत द्यावी, अशी आग्रही मागणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोकणातील मंत्र्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत भात नुकसानीचा मुद्दा कोकणातील मंत्री अदिती तटकरे, नितेश राणे आणि भरत गोगावले यांनी उपस्थित केला. मागील आठवड्यात सलग तीन- चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने कोकणात भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. भाताला शेतातच कोंब आल्यामुळे, भात कुजून गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. भिजलेला भात हाताला लागणार नाही. त्यामुळे सरकारने ठोस आर्थिक मदत देण्याची मागणी मंत्र्यांनी केली.
कोकणातील मंत्र्यांच्या एकमुखी मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आणि बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याचे आदेश दिले. दरम्यान, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंचनामे करण्याचे काम सुरू असल्याची माहिती बैठकीत दिली.
अतिवृष्टीच्या मदतीत ई – केवायसीची अडकाठी
अतिवृष्टी बाधितांना आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या वतीने तातडीने आर्थिक मदत मंजूर केली असली तरीही अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याचा मुद्दा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला. अॅग्रीस्टॅक नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याचेही त्यांनी निर्देशनास आणून दिले. याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देऊन तातडीने ई – केवायसी पूर्ण करण्याची सूचना दिली.
