मुंबई : दरवर्षी पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांमुळे गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अत्यंत धकाधकीचा होतो. खड्ड्यांमुळे कूर्मगतीने होणारा प्रवास, लहान-मोठे अपघात होण्याची भीती आदी विविध कारणांमुळे अनेक जण स्वतःच्या वाहनाऐवजी रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देतात. मात्र, कोकण रेल्वेच्या प्रयत्नामुळे खासगी गाडीचा प्रवास ‘रोल-ऑन रोल-ऑफ’ (रो-रो) सेवेद्वारे करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांची रस्त्यावरील खड्डे, गर्दीपासून सुटका होईल, तसेच इंधनाची बचत आणि कार्बन उत्सर्जन उपक्रमाला हातभार लागेल.
आरक्षण सुरू
रो-रोची सेवा २३ ऑगस्टपासून सुरू होत असून यासाठी २१ जुलै रोजीपासून आरक्षण सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्यातील कोलाड ते गोव्यातील वेर्णादरम्यान ही सेवा उपलब्ध असेल. ही सेवा कोलाड ते वेर्णा अशी दोन्ही बाजूने फक्त अंतिम स्थानकांकरिता सुरू करण्यात येत आहे. सायंकाळी ५ वाजता ही गाडी गोव्याच्या दिशेने रवाना होईल आणि ती दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता वेर्णा येथे पोहचेल. तर, परतीच्या प्रवासातही रो-रो सेवा वेर्णा येथून सायंकाळी ५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता कोलाड येथे पोहोचेल. प्रवास सुरू होण्यापूर्वी आधी तीन तास स्थानकांवर पोहचणे गरजेचे आहे. म्हणजे प्रवाशांना दुपारी २ वाजता स्थानकात पोहोचावे लागणार आहे.
या सेवेसाठी शुल्क किती ?
या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रती वाहन ७ हजार ८७५ रुपये शुल्क आकारण्यात येणार असून आरक्षण करताना ४ हजार रुपये नोंदणी शुल्क घेण्यात येणार आहे. तर, उर्वरित रक्कम प्रवासाच्या दिवशी जमा करावी लागेल. अपुरे आरक्षण म्हणजे १६ पेक्षा कमी वाहने असल्यास फेरी रद्द करून नोंदणी शुल्क पूर्णपणे परत करण्यात येईल.
प्रवाशांनाही प्रवास करता येणार
रो-रो सेवेला तृतीय वातानुकूलित डबा आणि द्वितीय वातानुकूलित डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे रो-रो सेवेतून खासगी वाहनाबरोबरच प्रवाशांनाही प्रवास करता येणार आहे. एका खासगी वाहनांसाठी फक्त तीन प्रवाशांना या डब्यातून प्रवास करण्याची मुभा असेल. यासाठी प्रवाशांना तृतीय वातानुकूलित डब्यासाठी प्रति प्रवासी ९३५ रुपये आणि द्वितीय वातानुकूलित डब्यासाठी १९० रुपये मोजावे लागतील.
२६ वर्षांपासून रो-रो सेवेद्वारे ट्रकची वाहतूक सुरू
कोकण रेल्वेवर १९९९ पासून रो-रो सुरू आहे. ही सेवा सध्या कोलाड ते वेर्णा, कोलाड ते सुरतकल आणि वेर्णा ते सुरतकल या मार्गावर सुरू आहे. एका फेरीमध्ये ४० ट्रकची वाहतूक केली जात आहे. कोकण रेल्वेवरून २६ वर्षांपासून ही सेवा सुरू आहे. तर, आता कोलाड ते वेर्णा दरम्यान नवीन रो-रो सेवा सुरू करून खासगी मोटारगाड्यांची वाहतूक करण्यात येणार आहे. विशेषतः संरचनेच्या रेकमधून गाड्यांची वाहतूक केली जाईल. एका फेरीत ४० गाड्यांचा प्रवास होऊ शकतो. एका वॅगनवर दोन गाड्या याप्रमाणे २० वॅगनचा एक रेक तयार केला आहे.