मुंबई : शुक्रवारपासून प्रदर्शित झालेली ‘सर्च: द नैना मर्डर केस’ ही वेबसिरीज चर्चेत आहे. अभिनेत्री कोंकना सेन बेवसिरीजमध्ये सहाय्यक पोलीस आयुक्ताच्या मध्यवर्ती भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी पोलिसांची कार्यपध्दती आणि जीवनशैली शिकविण्याचे काम एका महिला पोलीस अधिकाऱ्याने केले. तेजश्री शिंदे असे या महिला पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे.

तेजश्री शिंदे या सध्या ‘मिरा भाईंदर वसई विरार’ पोलीस आयुक्तालयातील काशिगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. भूमिकेत जिवंतपणा आणण्यासाठी कोंकना सेनने पोलिसांकडून हे खास प्रशिक्षण घेतले.

जिओ प्राईम या ओटीटीवर शुक्रवारपासून सर्च: द नैना मर्डर केस (Search: The Naina Murder Case) नावाची एक क्राईम थ्रीलर बेवसिरीज प्रदर्शित झाली आहे. ही सिरीज प्रसिद्ध डॅनिश क्राईम ड्रामा ‘द किलिंग’चा (The Killing) भारतीय रिमेक आहे. अभिनेत्री कोंकणा सेन मुख्य भूमिकेत आहे. तिने सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) संयुक्ता दास ही व्यक्तिरेखा साकारली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस कसा करतात? त्यांचे भावविश्व कसे आहे? त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कसे चढ – उतार होतात ? हे बेवसिरीजमध्ये दाखविण्यात आले आहे. पोलिसांची व्यक्तीरेखा अधिक जिवंत कशी होईल यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेण्याचे ठरवले. त्यासाठी एका डॅशिंग महिला पोलीस अधिकाऱ्याचा शोध सुरू होता.

म्हणून केली निवड

शोध घेतल्यानंतर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री शिंदे यांची निवड करण्यात आली. त्या धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिध्द आहेत. भरोसा कक्षात काम करताना परदेशात अडकलेल्यांची सुटका करण्यात त्यांचे कसब आहे. त्यांनी आपल्या बौध्दीक चातुर्याने गुन्ह्याचा छडा लावून अनेकांची सुटका केली आहे.

काही महिन्यांपूर्वी बेवसिरीजचे निर्माते, दिग्दर्शकांनी तेजश्री शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर कोंकणा सेनने पोलिसांचे धडे गिरविण्यात सुरवात केली. पोलीस वागतात कसे, बोलतात कसे, त्यांच्या वैयक्तित आयुष्यातील चढ-उताराचा कामावर कसा परिणाम होतो, ते सारे कोंकणाने शिकून घेतले. याबाबत माहिती देताना तेजश्री शिंदे यांनी सांगितले की, हा खुप सुखद अनुभव होता. मी मानसशास्त्रात एमए केले आहे. त्यामुळे त्यांना नेमके काय हवे हे मला समजत होते. त्यानुसार मी त्यांना माहिती देत गेली आणि त्यामुळे काम सोप्प झाले.

कोंकणा सेन झाली प्रभावीत

तेजश्री शिंदे यांच्यामुळे मला खूप शिकता आले. ती पोलीस असली तरी अल्पावधीत माझी चांगली मैत्रीण बनली. पोलिसांचे खडतर, शिस्तप्रिय जीवन, रुबाब, वचक सारे काही शिकायला मिळाले. त्याचा फायदा मला माझ्या बेवसिरीजसाठी झाला, असेही कोंकणाने सांगितले. ही ६ भागांची बेवसिरीज आहे. त्यात कोंकना सेनसोबत सिध्दार्थ दास, शिव पंडित आदींच्या मुख्य भूमिका आहेत.

मर्दानीसाठीही पोलिसांची मदत

यापूर्वी ‘मर्दानी’ सिनेमासाठी राणी मुखर्जीने मुंबईच्या गुन्हे शाखा ८ च्या पथकातील पोलीस निरीक्षक ज्योत्सना रासम यांच्याकडून धडे घेतले होते. ‘बेबी जासूस’ या सिनेमासाठी विद्या बालनने प्रसिध्द गुप्तहेर रजनी पंडित यांची मदत घेतली होती.