मुंबई : गेल्या वर्षी कुर्ला पश्चिम येथे झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघात प्रकरणातील आरोपी चालक संजय मोरे याच्यावर खुनाऐवजी सदोष मनुष्यवधाच्या आरोपांतर्गत खटला चालवण्यात येणार आहे. सत्र न्यायालयाने त्याच्यावर नुकताच सदोष मनुष्यवधाचा आरोप निश्चित केला. या अपघातात नऊजणांचा मृत्यू झाला होता व ४२ जण जखमी झाले होते.

गेल्या वर्षी १० डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता कुर्ला पश्चिमेकडील एस. जी. बर्वे मार्गावर चालक मोरे याचे नियंत्रण सुटल्याने बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली होती. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश कुलकर्णी यांनी मोरे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १०५ अंतर्गत सदोष मनुष्यवध, कलम ११० अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न, कलम ११८ (१) अंतर्गत स्वेच्छेने दुखापत करणे यासह इतर कलमांखाली आरोप निश्चित केले. मोरे याला त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या या आरोपांत दोषी ठरवण्यात आल्यास त्याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.

दरम्यान, न्यायालयाने काही दिवसांपूर्वी प्रकरणातील इतर दोन आरोपी आणि अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बेस्ट बसची मालकी असलेल्या दोन खासगी कंपन्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाने दोषमुक्त केले होते. त्यात एव्ही ट्रान्स (एमयूएम) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रमेश कटीगंडला आणि मोरया ट्रान्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी राम सूर्यवंशी यांचा समावेश होते. या दोघांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असा निष्कर्ष न्यायालयांना दोघांना दोषमुक्त ठरवताना काढला होता. चालक प्रशिक्षण, देखरेख आणि तैनातीमध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल बस चालक मोरे यांच्यासह या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता.