मुंबई : दरवर्षी मुंबईसह राज्यभर होणाऱ्या दहीहंडी उत्सवामध्ये कोट्यवधींची उलाढाल होते. विविध ठिकाणी उंच मानवी मनोरे रचून लाखोंची बक्षिसे पटकावण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगते. मात्र मानवी मनोऱ्यांचा हा रोमहर्षक थरार अनेक गोविंदासाठी जीवघेणा ठरला आहे. तर काहींच्या पदरी कायमस्वरूपी अपंगत्व आले असून अंथरुणाला खिळून राहायची वेळ आली आहे.

मुंबईतील पश्चिम उपनगरातील दहिसर येथे सरावादरम्यान ११ वर्षीय महेश जाधव या लहान गोविंदाचा सहाव्या थरावरून कोसळून मृत्यू झाल्यानंतर गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दहीहंडी उत्सवासंबंधित मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे सर्रास उल्लंघन केले जात असून १४ वर्षाखालील मुलांना गोविंदा पथकांमध्ये सामील करून घेतले जात आहे. लाखोंच्या दहीहंडी फोडण्यासाठीची चुरस आणि उंच मानवी मनोरे रचण्यासाठीची स्पर्धा अनेक गोविंदांसाठी जीवघेणी ठरत आहे. दहीहंडी उत्सवात झालेल्या अपघाताला वर्ष सरली तरी वेदना मात्र कायम आहेत.

विरार येथे राहणारा गोविंदा सूरज कदम २०२३ साली नालासोपारा (पूर्व) येथे गोविंदा पथकातून दहीहंडी फोडण्यासाठी गेला होता. तेव्हा रचलेले थर पहिल्या थराच्या शिडीमध्ये असलेल्या सूरज कदमच्या मानेवर येऊन कोसळले आणि त्याची मानेची नस दबली गेली. त्यानंतर सूरज कदमवर केईएम रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शस्त्रक्रियेनंतरही सूरज पूर्णपणे बरा झालेला नाही. तो अंथरूणालाच खिळून आहे. या अपघातानंतर नामांकित गोविंदा पथके, विविध संस्था आणि राजकीय संघटनांकडून सूरजला सहकार्य करून आर्थिक मदत करण्यात आली. मात्र आता सूरजला कायमचे अपंगत्व आले असून त्याच्या पायावर जखमाही झाल्या आहेत. ही जखम स्वच्छ करण्यासाठी सूरजला दिवसाला ३५० रुपये खर्च येतो, दररोज एवढा खर्च करणे शक्य नाही. सध्या सूरजला आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

दहीहंडी उत्सवानंतर जखमी गोविंदांकडे दुर्लक्ष

काही वर्षांपूर्वी नालासोपारा (पश्चिम) येथे एका मंडळाचा मानवी मनोरा रचण्याचा सराव सुरू होता. तेव्हा रचलेले थर सर्वात खाली असणाऱ्या एका गोविंदाच्या अंगावर कोसळले आणि जबर मार बसून सदर गोविंदाच्या मणक्याची नस दबली गेली. या गोविंदाला मंडळाकडून सहकार्य मिळाले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र दहीहंडी उत्सव झाल्यानंतर जखमी व अपंगत्व आलेल्या गोविंदांकडे दुर्लक्ष केले जाते आणि अधिकृतरित्या आर्थिक मदतीसाठी आवश्यक पावले उचलली जात नसल्याची खंत सदर गोविंदाने व्यक्त केली.

मंडळाची अधिकृत नोंदणी व विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष

मुंबईसह ठाणे व आसपासच्या शहरात हजारो गोविंदा पथके आहेत. १४ वर्षांवरील मुलांना गोविंदा म्हणून सहभागी करू नये, असे न्यायालयाने बजावले आहे. मात्र या नियमाचे सर्रास उल्लंघन होत आहे. तसेच अनेक गोविंदा पथके मंडळाची अधिकृत नोंदणी करीत नाही आणि गोविंदांचा विमा उतरविण्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी जखमी, अपंगत्व आलेले गोविंदा सरकारी आर्थिक मदतीपासून वंचित राहतात.