मुंबई : लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या दोन तरुणांच्या दुचाकीला बेस्ट बसने धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. पवई येथील आयआयटी संस्थेच्या प्रवेशद्वारासमोर शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला.
मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांपासून सेलिब्रेटींपर्यंत अनेक जण येत असतात. त्यामुळे या मंडळाची प्रसिध्दी वाढत आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. स्वप्निल विश्वकर्मा (२२) आणि देवांश पटेल (२२) हे दोन तरूण गुरूवारी रात्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दुचाकीवरून गेले होते.
स्वप्नील आणि देवांश लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन शुक्रवारी सकाळी घरी परतत होते. सकाळी साडेसहाच्या सुमारास पवई येथील आयआयटी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांची दुचाकी बेस्ट बसच्या बाजून पुढे जात होती. मात्र जागा निमुळती असल्याने दुचाकी बेस्ट बस आणि दुभाजाकाच्या मध्ये अडकली. त्यामुळे स्वप्नील आणि देवांश हे दोघे दुचाकीवरून खाली पडले. त्याच वेळी बेस्ट बसचे चाक देवांश पटेलच्या डोक्यावरून गेले. गंभीर जखमी झालेल्या देवांशला स्थानिकांनी उपचारासासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र सकाळी साडेआठ वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा
दुचाकी बेस्ट बस आणि दुभाजक यांच्यामध्ये अडकली होती. त्यामुळे हा अपघात झाला. बसचालक उत्तम कुमकर याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिली.
लालबाग राजा दर्शनाला जाताना अपघात
बुधवारी देखील लालबाग राजाच्या दर्शनासाठी जात असेलल्या अन्य एका वाहनाचा अपघात होऊन एका तरूणाचा मृत्यू झाला होता. बुधवारी संध्याकाळी गुजरातमधील ७ तरूण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मुंबईत येत होते. मुंबई – अहमदाबाद महामार्गावरील फाऊंटन हॉटेल येथे त्यांच्या गाडीने रस्त्यात नादुरूस्त उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातात हितेशभाईन पटेल (३२) याचा मृत्यू झाला. तर गाडीच्या मागील आसनावर बसेलल्या निराली शर्मा (२७), दामिनी प्रजापती (२८), जैवीनी राणा (२५), मेघा शालेकर (२८) आणि अंतिमा शर्मा (२५) या जखमी झाल्या.