मुलुंड वसाहत येथील जंगलात सहलीसाठी आलेल्या महाविद्यालयीन तरुणांपैकी एकाचा येथील तुळशी तलावात बुडून मृत्यू झाला. हे सर्व विद्यार्थी माटुंग्यातील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे आहेत. बुडालेल्या मुलाचे नाव मंदार पाटकर (वय- १७) असून तो भांडुप येथील राहणारा होता. व्हीजेटीआय महाविद्यालयातील ४२ मुलामुलींचा एक चमू मुलुंड वसाहत येथील जंगलात सहलीसाठी आला होता. फिरता फिरता हे सर्वजण तुळशी तलाव येथे आले असता त्यातील काही विद्यार्थी पोहोण्यासाठी आत उतरले. यामध्ये मंदारही होता. परंतु, पोहता पोहता मंदार खोल पाण्यात गेला व दिसेनासा झाला. त्याच्या मित्रांचा आरडाओरडा ऐकून आलेल्या सुरक्षारक्षकांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलीस व अग्निशमन दलाचे जवान उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.  

मोदींच्या शेजारी येडियुरप्पा कसे चालतात? -काँग्रेस
मुंबई – भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच नरेंद्र मोदी यांच्या सभेत येडियुरप्पा मांडीला मांडी लावून बसल्याचा मुद्दा काँग्रेसने उपस्थित केला आहे. ‘आदर्श’ घोटाळ्यावरून भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व काँग्रेसला लक्ष्य केले आहे. चव्हाण यांच्या विरोधात खटला दाखल करण्यास परवानगी नाकारली म्हणून राज्यपाल के. शंकरनारायण यांना परत बोलविण्याच्या मागणीसाठी भाजपच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली होती. पण भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून लोकायुक्तांनी ठपका ठेवल्याने राजीनामा दिलेल्या येडियुरप्पा यांना भाजपने सन्मानाने परत घेतले, तसेच जाहीर सभेत ते नरेंद्र मोदीसोबत बसले होते. हे फडणवीस, तावडे, सोमय्यांना कसे चालते, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी केला.

महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकास अटक
ठाणे : अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाविरोधात कारवाईचा बडगा उगारल्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकाने ठाणे वाहतूक शाखेतील महिला पोलीस शिपाईचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कळवा येथील शिवाजी चौकात मंगळवारी घडला. या प्रकरणी कळवा पोलिसांनी मोहम्मद रशिद मोहम्मद इकबाल खान (२२, रा. कौपरखैराणे) यास अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात वाहतूक नियंत्रणाचे काम करणाऱ्या महिला पोलीस शिपाई सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आला आहे. मंगळवारी सायंकाळी कळवा येथील शिवाजी चौकात मोहम्मद रिक्षामधून अवैध प्रवासी वाहतूक करीत होता. त्यावेळी पिडीत महिला पोलीस कर्मचाऱ्याने त्याची रिक्षा अडवून त्याच्याकडे वाहन परवाना मागितला. त्यावर त्याने कसले लायसन हवे, असे सांगत त्यांच्याशी हुज्जत घातली आणि त्यांचा विनयभंग केला.