मुंबई : मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसला (गाडी क्रमांक १२६१९) धडक बसून एका मादी बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रत्नागिरीतील आरटीओ कार्यालयानजिक रेल्वे पुलाजवळ घडली.

रत्नागिरीतील आरटीओ कार्यालयानजिकच्या रेल्वे पुलाजवळ गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईहून मडगावकडे जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसची (गाडी क्रमांक १२६१९) धडक बसल्यामुळे मादी बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती रेल्वे पोलीस अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी रत्नागिरी परिक्षेत्राचे वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली. वनविभागाचे पथक रात्री ११ पर्यंत घटनास्थली दाखल झाले.

तपासणीअंती बिबट्या मादी असून अंदाजे दोन ते तीन वर्षांची असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, धडावेगळी झालेली मान, तुटलेला जबडा आणि डोळ्याला झालेली इजा लक्षात घेता बिबट्याचा मृत्यू जागीच झाला असल्याचे वनविभागाने सांगितले.

मृत बिबट्याचे शव शुक्रवारी डॉ. रोहित रणभारे यांच्या पशुवैद्यकीय देखरेखीखाली शवविच्छेदन करून पूर्ण अवयवसांसह जाळून नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान रेल्वे पोलीस, आरपीएफ, वनविभागाचे अधिकारी, निसर्गप्रेमी आणि स्वयंसेवक उपस्थित होते. हा कार्यवाही विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई आणि सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मृत बिबट्याची स्थिती अत्यंत भीषण

घटनास्थळी पाहणी केली असता, बिबट्या रेल्वे रुळाशेजारी मृतावस्थेत आढळला. बिबट्याची मान धडावेगळी झाली होती. तसेच जबडा तुटला होता आणि उजवा डोळ्याला इजा झाली होती. प्राथमिक निरीक्षणानुसार, हा बिबट्या मादी असून वय साधारण २ ते ३ वर्ष इतके असावे, असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

नागरिकांना आवाहन

कोणताही वन्यपाणी अडचणीत सापडल्यास किंवा अशी दुर्घटना निदर्शनास आल्यास नागरिकांनी त्वरित वनविभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा मोबाइल क्रमांक ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई यांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईत अनेक विभागांचा सहभाग

या संपूर्ण कारवाईदरम्यान रेल्वे पोलीस विभगाचे सतीश विधाते (पीआय आरपीएफ), आर.एस.चव्हाण (एसएसआय), प्रवीण कांबळे (पोलीस शिपाई), अमर मुकादम, कमलेश पाल, व्ही. एस. पवार, तसेच वन्यप्राणीप्रेमी रोहन वारेकर, महेश धोत्रे, आशीष कांबळे, प्रेम यादव उपस्थित होते. वन विभागातर्फे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, पाली येथील वनपाल न्हानू गावडे आणि वनरक्षक शर्वरी कदम हे घटनास्थळी उपस्थित होते. ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी (रत्नागिरी-चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (रन्नागिरी-चिपळूण) प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.