आता येईल.. नंतर येईल.. भूक लागल्यावर पिंजऱ्यात शिरेलच.. या आशेवर गेले तीन दिवस डोळय़ांत तेल घालून पहारा देणाऱ्या वन खात्याने शनिवारी सर्व सज्जतेनिशी आयआयटीच्या मेकॅनिकल विभागाच्या कार्यशाळेत प्रवेश केला. बिबटय़ाला पकडण्यासाठी विशेष पिंजराही मागवला. पण ज्या कार्यशाळेच्या बाहेर गेले तीन दिवस सारे दबा धरून बसले होते, त्या कार्यशाळेत बिबटय़ाच काय त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणाही नव्हत्या.
 मुंबई आयआयटीच्या मेकॅनिकल विभागाच्या एका कर्मचाऱ्याला बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास येथील कार्यशाळेत बिबटय़ा दिसला. त्यानंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी सर्व उपाय करून झाले. तरीही बिबटय़ा काही  बाहेर येईना. बंद कार्यशाळेत सोडलेल्या कॅमेऱ्यातही बिबटय़ा दिसला नाही. त्यामुळे नक्की बिबटय़ा आत आहे की नाही, यावर चर्चा सुरू झाली. अखेर शुक्रवारी रात्री वन अधिकाऱ्यांनी स्वत:च कार्यशाळेत शिरून बिबटय़ाचा शोध घेण्याची योजना आखली आणि पहाटे दोनच्या सुमारास वन कर्मचारी संपूर्ण सुरक्षा पोशाखात आत शिरले, पण तेथे बिबटय़ाचा मागमूसही सापडला नाही. त्यामुळे खरोखरच तेथे बिबटय़ा होता का, येथूनच चर्चेला सुरुवात झाली आणि गेले तीन दिवस कार्यशाळेबाहेर कडेकोट पहारा देणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.