मुंबई : लोकल ट्रेनमध्ये दररोज देवासाठी देणगी, भिकारी, तृतीपंथीयांकडून पैसे मागणे नित्याचे झाले आहे. तसेच, फेरीवाल्यांच्या सततच्या वर्दळीमुळे प्रवाशांना त्रास होत असतानाच आता लोकलमधील प्रवाशांकडून मदतीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा नवा प्रकार अलीकडे वाढल्याचे समोर येत आहे.
दररोज लोकलमध्ये पैसे मागणाऱ्यांची संख्या वाढत असून आता ‘मी गरीब महिला असून माझ्या तरुण मुलीच्या लग्नासाठी मला १०, २०, ५० रुपये द्या’, अशा आशयाचे पिवळे कार्ड दिले जाते. प्रवाशांकडून नकार दिला जात असतानाही त्यांना जबरीने हे कार्ड दिले जाते. त्यानंतर वाटलेले कार्ड व दानशुरांनी दिलेले पैसे घेऊन महिला निघून जातात.
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. जलद व स्वस्त प्रवास असल्यामुळे अनेकजण लोकललाच पसंती देतात. मात्र, गर्दीने तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये दररोज फेरीवाल्यांमुळे प्रवाशांचा प्रचंड त्रास होतो. गर्दी काहीशी कमी झाल्यानंतर लोकलमध्ये भिकाऱ्यांचा त्रास सुरू होतो. अधूनमधून देवासाठी देणगी, तृतीयपंथी व अंध – अपंग व्यक्तीही पैसे मागण्यासाठी येत असतात. सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची रीघ लागलेली असते. रेल्वे प्रशासनाचाही यावर अंकुश नसल्याने पैसे मागणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे.
आता प्रवाशांकडून भिक मागण्याचा वेगळाच प्रकार वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज लोकलमध्ये काही महिला चढतात. ‘गरीबाची विनंती ऐका, मी एक गरीब विधवा आहे. माझी एक तरुण मुलगी आहे. मला तिचे लग्न करायचे आहे. मला १०, ०, ५० रुपये किंवा कपडे देण्याची कृपा करावी. ज्याच्यातून मी तिचे लग्न करू शकेल. कृपया कार्ड वाचून परत करावे.’ अशा आशयाचे पिवळे कार्ड त्यांच्याकडे असते. ट्रेनमधील प्रवाशांना हे कार्ड दिले जाते. अनेक वेळा प्रवाशांकडून ते घेण्यास नकार दिला जातो, परंतु ते कार्ड त्यांच्या मांडीवर ठेकवले जाते. त्यांनतर पाच मिनिटांनंतर कार्ड परत घेतले जाते आणि मग प्रवाशांसमोर हात पसरणे सुरू होते. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
प्रवाशांकडे भीक मागणे कायद्याने गुन्हा
प्रवाशांना त्रास देणे, भिक्षा मागणे, किंवा बेकायदेशीर विक्री करणे हे रेल्वे सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे. अशा व्यक्तींना रेल्वे पोलीस (जीआरपी) किंवा रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अटक करून कारवाई करू शकतात. लोकलमध्ये अवैधरीत्या विक्री करणारे, तसेच भिकाऱ्यांची रेल्वे हेल्पलाईन क्रमंक १३९ वर तक्रार करता येते.
रॅकेटचा भाग असल्याचा संशय
या महिला ठराविक वेळी आणि ठराविक डब्यात येतात. सर्व एखाद्या संघटित रॅकेटचा भाग असल्याचा संशय अनेक प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे. प्रत्येक महिलेचे वागणे आणि त्यांच्या हातातील पिवळे कार्ड सारखेच असल्याने संशय अधिकच बळावत आहे.