मुंबई : ‘मी एकदा आळीत गेलो आणि चाळ घेऊनी बाहेर आलो…’ हे पुलंच्या लेखणीतून उतरलेले धमाल गीत ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या खणखणीत आवाजात पार्ले येथील लोकमान्य सेवा संघात घुमले आणि क्षणात पुलंचे साहित्य, त्यांची गाणी, चित्रपट या सगळ्यांनी उपस्थितांच्या मनाची पकड घेतली. रसिकांपर्यंत फारसे न पोहोचलेले त्यांचे विचार, निरीक्षणे, व्यक्तिचित्रणे अशा अपरिचित पुलकित आठवणींनी ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’चा मंच बुधवारी मोहरला.

निरातिशय आनंदाने फिरताना, कोण्या पंत-लेखकांशी संवाद साधताना, समकालीन सारस्वतांच्या साहित्यावर व्यक्त होताना त्यांच्या अंतर्मनातील हितगूजही पुलंनी कागदावर उतरवले. तरीही रसिकांपर्यंत फारसे न पोहोचलेले त्यांचे विचार, निरीक्षणे, व्यक्तिचित्रणे अशा अपरिचित पुलकित आठवणींना ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’च्या मंचावर उजाळा देण्यात आला.

मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने जुळून आलेला योग आणि त्याच दिवशी पार्ले येथील लोकमान्य सेवा संघात रंगलेल्या ‘लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट’ कार्यक्रमात पुलंच्या साहित्यिक गमतीजमतींनी खळखळून हसण्याचा आनंद रसिकांना ‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमात अनुभवता आला.

ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, नाटककार सतीश आळेकर, ख्यातनाम अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी ‘अपरिचित पुलं’ कार्यक्रमात पुलंचे विविधांगी लेखनाचे अभिवाचन, कविता, गाण्यांच्या माध्यमातून सादर केले. त्यांना तबल्यावर अपूर्व द्रविड आणि हार्मोनियमवर दीप्ती कुलकर्णी यांनी साथसंगत केली.

‘अपरिचित पुलं’ या कार्यक्रमातून खूप कमी वाचले गेलेले, काहीसे न पाहिलेले, काहीसे न ऐकलेले पुलंचे किस्से, विचार पोहोचवण्याचा उद्देश असल्याचे गिरीश कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. ‘बेटकुळी’, ‘बरे आहे’ या शब्दावरून बरे, ठीक, चांगले, छान या शब्दभावंडांचे अर्थ, त्यातून साधली जाणारी गंमत रंगवणारा लेख, ‘आंबा पिकतो, रस गळतो’ या गाण्यामागची आठवण जागवणारा लेख, ‘गाळीव इतिहास’ हा मराठी भाषेतील प्रथितयश साहित्यिकांबरोबरच काही ग्रंथ-पुस्तकांसंदर्भातील चित्रविचित्र नोंदी सांगणारा लेख असे एकामागून एक किस्से-आठवणीतून हा कार्यक्रम रंगत गेला. अतिशय गंभीर परिस्थितीवर कोटी करत भाष्य करणाऱ्या पुलंची शांतिनिकेतनमध्ये वास्तव्य केल्यानंतर निरोप घेताना झालेली कातर भावावस्था, पुलंनी केलेला पत्रव्यवहार अशा सगळ्याच मिलाफातून बहुढंगी पुलं गवसले, तरीही दशांगुळे व्यापून उरले.