पाठपुराव्याबद्दल “लोकसत्ता”ला धन्यवाद
मद्यपी नवऱ्याने तीन मुलांसह घराबाहेर काढलेल्या अमृता ऊर्फ आफरीन शेख या महिलेच्या “लोकसत्ता”ने वाचा फोडलेल्या करुण कहाणीमुळे महिलांवरील अत्याचाराच्या सामाजिक समस्येचे एक अस्वस्थ करणारे रूप समोर आल्याने, राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची स्वतहून गंभीर दखल घेतली असून याप्रकरणी संपूर्ण चौकशीचे आदेश राज्य महिला आयोगास देण्यात आले आहेत.
परिस्थितीच्या रेटय़ामुळे आपले दीड महिन्यांचे बाळ विकण्यासाठी अमृताला भाग पाडण्याचा दलालांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्यानंतर अमृताच्या तीनही मुलांना बालगृहात ठेवण्यात आली आहेत. उद्या राष्ट्रीय महिला आयोगाचे शिष्टमंडळ तुरुंगात दुर्दैवी अमृताची भेट घेणार असून बालगृहात असलेल्या तिच्या तीन मुलांची पाहणी करणार आहे.
“लोकसत्ता”ने सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून केलेला या प्रकरणाचा पाठपुरावा कौतुकास्पद असून या पीडित महिलेच्या व तिच्या बालकांच्या मदतीसाठी घेतलेली सकारात्मक भूमिका स्वागतार्ह आहे,असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. अमृताला योग्य ते कायदेशीर साह्य आणि जामीन मिळवून देण्यासाठीही महिला आयोग मदत करणार आहे, अशी ग्वाही देतानाच, मूल विक्रीच्या या रॅकेटमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी व अमृताला वाऱ्यावर सोडून रस्त्यावर येण्यास भाग पाडणाऱ्या नवऱ्यालाही शासन व्हावे यासाठीही आयोग पुढाकार घेईल असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
“लोकसत्ता”मध्ये प्रसिद्ध झालेली ही बातमी महिलांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने महिला आयोगाने त्याची स्वतहून दखल घेतली असून राज्य महिला आयोगानेही तातडीने या प्रकरणी सखोल चौकशी करावी, असे राष्ट्रीय महिला आयोगाने सुचविले आहे. अमृता ज्या तुरुंगात आहे, तेथे तातडीने भेट देऊन माहिती घ्यावी, संबंधित प्रकरणाच्या तपासाची व गुन्हा नोंदीची कागदपत्रे सुरक्षित रहावीत यासाठी पोलीस मुख्यालयाशी संपर्क ठेवावा तसेच अमृताच्या पुढील कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी वकील नियुक्त करून सामाजिक कार्य करणाऱ्या बिगरशासकीय संस्थांशी समन्वय ठेवावा, असे आदेश आयोगाने राज्य महिला आयोगास दिले आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 8th Sep 2012 रोजी प्रकाशित
दुर्दैवी अमृताची कहाणी : राष्ट्रीय महिला आयोग सखोल चौकशी करणार!
मद्यपी नवऱ्याने तीन मुलांसह घराबाहेर काढलेल्या अमृता ऊर्फ आफरीन शेख या महिलेच्या "लोकसत्ता"ने वाचा फोडलेल्या करुण कहाणीमुळे

First published on: 08-09-2012 at 07:06 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta effact state women rights commission national commission for women amrita pet name afreen afreen mother sell her child mother sell her baby