मुंबई : स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा, अन्य प्रयोजनानिमित्त विविध सामाजिक संस्थांकडून मागील दोन महिन्यांमध्ये राज्यभरात मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे अनेक रक्तपेढ्यांमध्ये अतिरिक्त रक्त संकलन झाले आहे. हे रक्त वाया जाऊ नये यासाठी अतिरिक्त रक्त संकलन करणाऱ्या रक्तपेढ्यांनी उपेक्षित जिल्ह्यातील रक्त केंद्रांमध्ये चौकशी करून त्यांना रक्त वितरित करावे, अशी सूचना राज्य रक्त संक्रमण परिषदेने (एसबीटीसी) केली आहे. त्यामुळे अतिरिक्त रक्त वाया न जाता त्याचा योग्य वापर होईल.
स्वातंत्र्य दिनापासून २ ऑक्टोबरपर्यंत राज्यामध्ये विविध उत्सवांदरम्यान सामाजिक, राजकीय व धार्मिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. परिणामी ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात रक्त संकलित झाले. अनेकदा राजकीय दबावाखाली आवश्यकता नसतानाही रक्तपेढ्यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे लागते.
अतिरिक्त रक्त संकलनामुळे रक्त वाया जाण्याचे प्रमाण लक्षात घेता एसबीटीसीने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना मागील तीन वर्षांची रक्ताची सरासरी मागणी लक्षात घेऊन रक्त संकलन करण्याच्या, तसेच कोणत्याही परिस्थितीत रक्तपेढीमार्फत अतिरिक्त रक्त संकलन केल्यानंतर ते मुदतबाह्य होऊन वाया जाणार नाही याबाबत दक्षता घ्यावी अशी सूचना करण्यात आली होत्या. तसेच रक्तदान शिबीर संयोजकांचे समुपदेशन करून रक्ताच्या तुटवड्याच्या कालावधीत रक्तदान शिबिरे आयोजित करण्याबाबत विनंती करावी, असेही सूचविण्यात आले आहे. मात्र तरीही काही जिल्ह्यांमधील रक्त केंद्रांमध्ये गरजेपेक्षा जास्त रक्त संकलित झाल्याचे निदर्शनास आले आहे.
हे रक्त वाया जाऊ नये यासाठी एसबीटीसीने कमी रक्त संकलित होणाऱ्या रक्तपेढ्यांना अतिरिक्त रक्ताचे वितरण करण्याचे निर्देश दिले आहेत. कमी रक्त संकलित होत असलेल्या भंडारा, गोंदिया, हिंगोली, नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांमधील रक्तपेढ्यांकडे चौकशी करून अतिरिक्त रक्त वितरित करावे, जेणेकरून अतिरिक्त रक्ताचा योग्य वापर होऊन रक्त वाया जाणार नाही, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
एसबीटीसीकडून प्रथमच समन्वयकाची नेमणूक
अतिरिक्त रक्त संकलित करणाऱ्या रक्तपेढ्यांतील रक्त कमी रक्तसाठा असलेल्या रक्तपेढ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया सुलभ व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी एसबीटीसीने यंदा प्रथमच समन्वयकाची नेमणूक केली आहे. यामुळे रक्ताच्या वाहतुकीमध्ये येणारे अडथळे दूर करून एकाच फेरीमध्ये एका जिल्ह्यातील अतिरिक्त रक्त दुसऱ्या जिल्ह्यात नेणे सहज सोपे होणार आहे. त्याचबरोबर रक्ताची विक्री होण्याच्या प्रकाराला आळा घालणे शक्य होणार आहे.