मुंबई : महानगरपालिकेने निश्चित केलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकाचे (एफएसआय) उल्लंघन करत अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकाम केल्याप्रकरणी लोअर परळ येथील बेनिफिस बिझनेस हाऊसवर निष्कासनाची कारवाई केली जात आहे. महानगरपालिकेच्या जी विभागाच्या वतीने सुरू असलेल्या या कारवाईत बेनिफिस बिझनेस हाऊसमधील एक अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. तर, दोन अनधिकृत बांधकामांची पाडकाम प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

मुंबईतील अनधिकृत बांधकामांविरोधात महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात निष्कासनाची कारवाई केली जात आहे. या अनुषंगाने परिमंडळ २ चे उपायुक्त प्रशांत सपकाळे, जी दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांच्या नेतृत्वात लोअर परळ भागातील अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर कारवाई हाती घेण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, लोअर परळ येथील ना. म. जोशी मार्गावरील बेनिफिस बिझनेस हाऊसमधील विविध अनधिकृत बांधकामांवर महानगरपालिका प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

बेनिफिस बिझनेस हाऊसमध्ये महानगरपालिकेने निश्चित केलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकाचे (एफएसआय) उल्लंघन करण्यात आल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले होते. त्यांनतर पालिकेने त्याठिकाणी कारवाई करत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले. महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागातील इमारत व कारखाने विभागाकडून १६ ते १९ सप्टेंबर या कालावधीत युनिट क्रमांक १ सी येथील अनधिकृत बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. तर, युनिट क्रमांक ३ ए आणि ४ ए तसेच युनिट क्रमांक ३ सी व ४ सी येथे पाडकामाची प्रक्रिया सुरू आहे.

बेनिफिस बिझनेस हाऊसमधील तीन ठिकाणी अनधिकृतपणे अतिरिक्त बांधकाम करण्यात आले होते. यामध्ये युनिट क्रमांक १ सी येथील पूर्वेकडील मजल्यावर २१०.८ मीटर, युनिट क्रमांक ३ ए आणि ४ ए येथे २६० चौरस मीटर आणि युनिट क्रमांक ३ सी व ४ सी येथे १६६ चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. दरम्यान, अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांवर कारवाईची ही मोहीम सुरू राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.