मुंबईत सुरु असलेले विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे निर्धारीत कालवधीतच संपणार आहे. अधिवेशनाची सुरुवात ही २२ डिसेंबरला झाली तर २८ डिसेंबरला हे अधिवेशन संपणार असल्याचं विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आधीच जाहीर करण्यात आलं होतं. मात्र नियमाप्रमाणे अधिवेशन सुरु असतांना आणखी एक कामकाज सल्लागार समितीची बैठक आज सकाळी पार पडली. त्यामधे २८ तारखेलाच अधिवेशन संपणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं.

भाजपाने विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी आजच्या बैठकीत केली. राज्यातील विविध विषयांवर चर्चा बाकी असून राज्य सरकारकडून उत्तर – न्याय मिळणे अपेक्षित आहे असा मुद्दा भाजपाने मांडला. मात्र राज्य सरकारने ही मागणी फेटाळून लावली आणि २८ तारखेलाच विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज संपणार असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान २८ तारखेला म्हणजे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष पदासाठी निवडणुक घेतली जाणार असल्याचं कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. यासाठी २७ तारखेला अर्ज भरण्याची प्रक्रिया पुर्ण केली जाईल. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार ही निवडणुक गुप्त मतदान पद्धतीने न होता आवाजी मतदानाने होणार आहे. या बदलेल्या निवडणुक प्रक्रियेबाबत भाजपाने नाराजी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ असल्याने ही निवडणुक एक औपचारिकता ठरणार आहे. असं असलं तरी या निवडणुकीसाठी भाजपा उमेदवार मैदानात उतरवतो का हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.