मुंबई : मूर्तिजापूर (जि. अकोला) तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.
घोंगा लघुपाटबंधारे योजनेचे काम १९८६ मध्ये झाले आहे, तर कानडी लघुपाटबंधारे योजनेचे काम १९७७ मध्ये झाले आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या पिचिंग (अस्तर) ना – दुरुस्त झाले आहे. कालव्यामध्ये झाडेझुडपे वाढली आहेत, प्रकल्पावरील सेवा रस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यासाठी या दोन्ही प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून खर्चास मान्यता देण्यात आली. त्यानुसार घोंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या ४ कोटी ७६ लाख ५५ हजार ३०० रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीमुळे ३५ स.घ.मी. पाणीसाठा आणि ४५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणीसाठा १५५० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता ३५० हेक्टर आहे.
कानडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या ४ कोटी ९२ लाख ३२ हजार ९८६ रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे ३८ स.घ.मी. पाणीसाठा आणि ४६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणीसाठा १७०० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता २८६ हेक्टर आहे.