मुंबई : अमेरिकेतील मराठी शाळांमध्ये आता मराठीचे धडे महाराष्ट्र शासनातर्फे दिले जाणार आहेत. तेथील शाळांमध्ये राज्य शासनातर्फे अभ्यासक्रम देऊ, अशी ग्वाही राज्याचे माहिती तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक कार्य मंत्री अँड. आशिष शेलार यांनी शुक्रवारी अमेरिकेत दिली. अमेरिका दौऱ्यावर असणाऱ्या शेलार यांनी कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्कोमधील बे एरिया येथे मराठी शाळा चालवणाऱ्या महाराष्ट्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
तेव्हा त्यांच्याशी तेथील मराठी शाळांबाबत चर्चा झाली. त्यावेळी शेलार यांनी ही ग्वाही दिली. अमेरिकेत सेवा भावाने एकत्र आलेली मराठी माणसे आपल्या मुलांना मराठी भाषा, संस्कृती, इतिहास आणि आपल्या महाराष्ट्रातील लोकपरंपरा शिकवून ‘ मराठीचा संस्कार ‘ आपल्या नव्या पिढीवर व्हावा, म्हणून तेथे मराठी शाळा चालवीत आहेत. ही शाळा २००५ पासून चालविली जाते. सुमारे ३०० विद्यार्थी येथे मराठी शिकत आहेत.
अमेरिकेत अशा ५० हून अधिक मराठी शाळा असून त्या सेवा भावनेतून तेथील मराठीजन चालवीत आहेत. अमेरिकेतील स्थानिक प्रशासनाला जर महाराष्ट्र शासनाने शिफारस केली आणि अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला तर मराठी भाषा शिकविणे, परीक्षा घेवून विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे सुलभ होईल, असे या शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी शेलार यांना सांगितले.
याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करुन राज्य शासनाचे आवश्यक ते सहकार्य दिले जाईल. अमेरिकन प्रशासनाला शिफारस व शाळेला अभ्यासक्रम अवश्य दिला जाईल, असे आश्वासन शेलार यांनी अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाला दिले.
महाराष्ट्रात वाद; अमेरिकेत मराठीचा झेंडा
महाराष्ट्रात सध्या मराठी माध्यमातील मुलांना पहिलीपासून हिंदी सक्तीचा वाद सुरू आहे. सरकार ही हिंदी सक्तीपासून मागे हटण्यास तयार नाही व सध्या उच्चस्तरीय समिती याबाबत अभ्यास करीत आहे. पण बहुसंख्य मराठी कुटुंबियांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये घातले आहे. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय व्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे परदेशात जाण्यासाठी इंग्रजीतून शिक्षण घेण्याकडे मराठी कुटुंबातील मुलांचा कल आहे. मात्र अमेरिकेत स्थायिक झालेले मराठीजन हे आपल्या मुलांना मराठीचे धडे देत आहेत, हे उल्लेखनीय आहे.