मुंबई : अभिनेता अमीर खान यांच्या पुढाकाराने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यात सुरू असलेल्या फार्मर कप २०२४ मधील विजेत्या २५ शेतकरी गटांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यासाठी सरकारने १.२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने शुक्रवारी या बाबतचा शासन आदेश प्रसिद्ध केला आहे.

बालेवाडी (पुणे) येथे मार्च २०२५ मध्ये पाणी फाउंडेशन मार्फत आयोजित फार्मर कप २०२४ या पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात राज्य पातळीवर विजयी झालेल्या २५ शेतकरी गटांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी १.२५ कोटी रुपये रक्कमेची गरज होती. ही रक्कम कृषी आयुक्तालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बक्षिसाची रक्कम कृषी यांत्रिकीकरण, लहान शेतकऱ्यांना यंत्र भाडे, शेतीची हंगामपूर्व तयारी, बियाणे, कीडनाशके, खते, शेतीमालाची साठवणूक सुविधा, प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी हा निधी खर्च करावा, असेही शासन निर्णयात म्हटले आहे.

फार्मर कप स्पर्धेत नेमके काय होते

आमिर खान यांच्या पुढाकाराने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून फार्मर कप स्पर्धा घेण्यात येते. या स्पर्धेत शेतकरी गटांना सहभागी करून घेतले जाते. शेतकऱ्यांना पीक लागवडीपासून विक्रीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावर मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. त्यांना प्रशिक्षण दिले जाते. या सर्वाचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ झाली आहे. फार्मर कप स्पर्धेला आता सरकारी बळ मिळणार आहे.