मुंबई : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) घेण्यात येत असलेल्या पॅट परीक्षेचा गणित व इंग्रजीची प्रश्नपत्रिका शुक्रवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने ती बदलण्याची शक्यता होती. मात्र शनिवारी परीक्षेसाठी प्रत्यक्षात तिच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामुळे समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून एससीईआरटी कशा प्रकारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करणार, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण (स्टार्स) या केंद्र सरकार पुरस्कृत प्रकल्पांतर्गत २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार प्रथम भाषा, तृतीय भाषा (इंग्रजी) आणि गणित या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका परिषदेकडून शाळांना उपलब्ध करण्यात येतात. मराठी भाषेची परीक्षा शुक्रवारी झाल्यानंतर अवघ्या काही तासांनतर गणित व इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिका या काही क्लासेचच्या समाज माध्यमांवर व्हायरल झाली. तसेच १०० टक्के हीच प्रश्नपत्रिका येणार असा दावाही त्यांच्याकडून करण्यात आला होता.

अवघ्या काही तासांमध्ये ही प्रश्नपत्रिका हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहचली. या प्रश्नपत्रिकेसोबत उत्तरेही देण्यात आली होती. तसेच समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेली आणि शाळांना उपलब्ध झालेली प्रश्नपत्रिका सारखीच असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी कोणती प्रश्नपत्रिका द्यायची असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. मात्र प्रत्यक्षात एससीईआरटीकडून याबाबत कोणतीही सूचना न मिळाल्याने अखेर शाळांनी शनिवारी झालेल्या गणिताच्या परीक्षेसाठी समाज माध्यमांवर प्रसिद्ध झालेलीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना दिली.

दरवर्षी एससीईआरटीकडून अपुऱ्या प्रश्नपत्रिका आल्यानंतर शाळांना त्याची नक्कल प्रत काढावी लागते. यावरून एससीईआरटीकडून शिक्षकांना धारेवर धरण्यात येते. त्यामुळे शाळा प्रश्नपत्रिकांची नक्कल करण्यास धजावत नाहीत. असे असतानाही समाज माध्यमावर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेमुळे शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. त्यातच समाज माध्यमावर प्रसिद्ध झालेलीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी उपलब्ध करून द्यावी लागल्याने विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत शिक्षकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

ग्रामीण व महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे नुकसान

समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिका काही तासांमध्ये हजारो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्याने त्यांना परीक्षेत उत्तम गुण मिळण्याची शक्यता आहे. यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या ग्रामीण व शहरातील झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. या विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी गुण मिळण्याबरोबरच त्यांच्या मूल्यांकनातही घट होण्याची शक्यता शिक्षकांकडून वर्तविण्यात येत आहे.