मुंबई : राज्यातील व्याघ्र संवर्धनाची वाटचाल देशात आदर्श ठरली आहे. राज्यात केवळ वाघ संवर्धनच नव्हे तर वन पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्था घडवत आहोत. पुढील काळात व्याघ्र संवर्धनात नागरिकांचा व्यापक सहभाग वाढविण्यासाठी नवीन धोरण आखण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केले.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त महाराष्ट्र वन विभाग व एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर आदी या वेळी उपस्थित होते. राज्यात वाघांची संख्या वाढवण्यासाठी जे प्रयत्न झाले, त्याचे कौतुक देशभर होत आहे. व्याघ्र संवर्धनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे, याचा अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आज राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवत आहे. देशभरातील पर्यटक आणि संशोधक येथे भेट देतात. परिणामी स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, त्यातून एक मोठी अर्थव्यवस्था निर्माण झाली आहे. ही जैवविविधतेची संपत्ती आता आपण जगासमोर मांडू शकतो. या प्रकल्पावर तयार केलेली ‘वाईल्ड ताडोबा’ ही चित्रफीत ताडोबाचे सौंदर्य आणि संवर्धनाचे कार्य जागतिक पातळीवर पोहोचवेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.
‘वाईल्ड ताडोबा’ माहितीपटाचे अनावरण
महाराष्ट्र वन विभागाच्या वन्यजीव शाखेच्या वतीने निर्मित ‘वाईल्ड ताडोबा’ या माहितीपटाचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. तसेच एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या वतीने वन्यजीव संवर्धन आणि जागरूकता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते सुब्बिया नल्लामुथु यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
व्याघ्र संवर्धनासाठी तयार केलेली धोरणे ही प्रगतीशील असल्याने त्यांना नागरिकांचेही मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. पुढील काळात वनांजवळच्या ज्या जमिनींवर शेती करू शकत नाही, अशा जमिनी घेऊन त्यावर ग्रामस्थांसाठी रोजगार निर्मिती करण्याचे नियोजन आहे. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.