मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर आणि सकारात्मक प्रतिसादानंतर केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्डने सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे कोअर कमिटीची बैठक बोलावून राज्यव्यापी संप मागे घेतला.
फलटण येथील महिला डॉक्टरच्या मृत्युप्रकरणी महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयांमधील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून कामबंद आंदोलन पुकारले होते. त्यानुसार बाह्यरुग्ण विभागातील सेवा बंद ठेवत फक्त आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू ठेवल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या चर्चेनंतर प्रकरणाची व्यापक आणि निष्पक्ष चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय विशेष समिती (एसआयटी) स्थापन केली जाईल, निवासी डॉक्टरांच्या संप कालावधीतील दोन दिवसांची उपस्थिती कर्तव्यावर मानली जाईल, सहभागींना कोणताही शैक्षणिक किंवा प्रशासकीय दंड होणार नाही, या मागण्या मान्य करण्यात आल्या. सरकारने कालबद्ध पद्धतीने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने, केंद्रीय मार्ड आणि बीएमसी मार्ड अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच सर्व निवासी डॉक्टर तात्काळ कामावर रुजू होतील, असे जाहीर केले.
