मुंबई : राज्यातील नागरिकांच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ‘टेलीमानस सेवा’ तसेच राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम यांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होत असून विशेषतः बाह्यरुग्ण (ओपीडी) सेवांचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, या कार्यक्रमाला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
मानसिक आरोग्य सेवेचा लाभ जनतेला मोफत मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत सुरू केलेली टेली-मानस ही मोफत सुविधा २४ तास उपलब्ध केलेली आहे. याद्वारे मानसिक आरोग्य विषयक मोफत सल्ला देण्यात येतो. ऑक्टोबर २०२२ पासून सुरू झालेल्या टेली मानस हेल्पलाइन (क्रमांक १४४१६) या टोल फ्री क्रमांकावर लाखो लोकांना मानसिक ताण, नैराश्य, चिंता विकार तसेच भावनिक अडचणींवर समुपदेशन सेवा पुरविण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयात मानसिक आजारांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ घेणाऱ्या बाह्यरुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०२४-२५ या वर्षात या कार्यक्रमांतर्गत १६,८८,२६१ रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवांचा लाभ घेतला आहे. या तुलनेत २०२२-२३ मध्ये ही संख्या ६,६४,६१८ होती. तर २०२३-२४ मध्ये ९,१८,८७२ बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतला. ही वाढ मानसिक आरोग्याबाबतची जागरूकता आणि सेवेची उपलब्धता दर्शवते.
याशिवाय आरोग्य विभागाच्या पुणे, ठाणे, नागपूर आणि रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णालयांमध्येही रुग्णांना सेवा पुरवली जात आहे. सन २०२४-२५ मध्ये या चार मनोरुग्णालयांमध्ये एकूण १,८८,०८० बाह्यरुग्णांनी आणि २७,००६ आंतररुग्णांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. या मनोरुग्णालयांच्या विकासाची योजना आरोग्य विभागाने तयार केली असून निधी उपलब्धतेनुसार याचा विकास केला जाणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
त्याचप्रमाणे मानसिक आरोग्याची वाढती समस्या लक्षात घेऊन थेट प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावार मानसिक चिकित्सेचा उपक्रम नेण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या स्तरावर १,९०६ प्राथमिक मानसिक आरोग्य केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. तसेच, जेष्ठ नागरिकांसाठी स्मृतिभ्रंश क्लिनिक आणि मानसिक पुनर्वसन व दैनंदिन जीवन सुधारण्यासाठी डे केअर सेंटर्स सुरू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये, तुरुंग, वृद्धाश्रम आणि भिकारी निवाऱ्यांमध्ये समुदाय स्तरावरील हस्तक्षेप उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणात मानसिक आरोग्य तपासणी सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.
राज्यातील नागरिकांना मानसिक आरोग्याविषयी जागरूक करणे, सल्लामसलत सहज उपलब्ध करून देणे आणि उपचार प्रक्रियेला गती देणे हे सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘टेली मानस सेवा’ आणि राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रमांमुळे मानसिक आजारांविषयीची भीती कमी होऊन समाजात सकारात्मक मानसिकता विकसित होत आहे.’जीवनातील वाढत्या ताण-तणावांमुळे अनेकांना मानसिक आरोग्य सेवेची आवश्यकता असते.
संकटात असलेले, परीक्षेचा ताण असलेले विद्यार्थी, कौटुंबिक समस्या असणारे, आत्मघाती विचार करणारे, व्यसन संबंधित समस्या असलेले, नातेसंबंध, स्मृतीसंबंधी समस्या, आर्थिक ताण; तसेच इतर मानसिक आरोग्य विषयक चिंता असलेले १४४१६ आणि १८००-८९१४४१६ या क्रमांकांवर संपर्क साधून मोफत सल्ला आणि समुपदेशन घेऊ शकतात. आता ही सेवा २४ तास सुरू झाल्याने मानसिक त्रास असलेल्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. या टोल-फ्री क्रमांकावर फोन करून नागरिक त्यांच्या आवडीची भाषा निवडू शकतात.
हा फोन संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ‘टेली-मानस सेल’ कडे पाठवला जातो. ही सेवा दोन-स्तरीय प्रणालीमध्ये चालविली जाते. या अंतर्गत टियर-१मध्ये प्रशिक्षित समुपदेशक आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश असलेल्या राज्य ‘टेली-मानस सेल’चा समावेश आहे. टियर-२मध्ये शारीरिक समुपदेशनासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम, वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुविधा तसेच दृकश्राव्य समुपदेशनासाठी ‘ई-संजीवनी’ या उपक्रमातील तज्ज्ञांचा समावेश असतो.
मानसिक आरोग्याविषयी मोफत सल्ला मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेली ‘टेली-मानस’ सुविधा २४ तास सुरू राहणार आहे. आरोग्य विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे; तसेच मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या विविध संस्था आणि तज्ज्ञ यांच्या सहकार्याने राज्यभर ‘टेली-मानस’ या सेवेचा प्रसार करण्यात येत आहे. ही सेवा मोफत आणि सहज उपलब्ध असल्याने मानसिक आजारांच्या रुग्णांना याचा लाभ होत आहे. मानसिक समस्येवर वेळेत उपचार मिळावेत, यासाठी सेवेची गुणवत्ता वाढविण्यात येत आहे.
राज्याचा आरोग्य विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे, प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, त्याचप्रमाणे मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या विविध संस्था आणि तज्ज्ञांच्या सहकार्याने राज्यभर टेली-मानस या सेवेचा प्रसार होण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्य आरोग्य विभाग, प्रादेशिक मनोरुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टर, समुपदेशक, मानसिक आरोग्य विषयक काम करणाऱ्या संस्थांमधील तज्ज्ञ यांचे ६० व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केले आहे.
त्यांच्या सहकार्याने आणि सहभागाने टेलीमानस सेवेबाबत जनजागृती करण्यात येत आहे. या साहित्यामध्ये छोटे व्हिडीओ, क्रिएटिव्ह पोस्टर्स, बॅनर्स यांचा समावेश असणार आहे.राज्यात मानसिक आरोग्याच्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचविण्यात कार्यक्रम यशस्वी होत आहे. अधिकाधिक लोकांना उपचारांसाठी समोर येण्यास प्रोत्साहन मिळत आहे. तथापि, प्रादेशिक मनोरुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरून आणि मंजूर निधीचा संपूर्ण विनियोग करून हा कार्यक्रम अधिक बळकट करण्याची गरज आहे.