मुंबई : ‘वेव्हज’ परिषदेची जागतिक राजधानी ही मुंबईच असेल. भारत सरकारकडून ‘वेव्हज’ परिषद दरवर्षी किंवा दोन वर्षांच्या अंतराने आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी ‘वेव्हज’ परिषद भारताची मनोरंजन राजधानी असलेल्या मुंबईतच आयोजित करण्यासाठी उत्सुक आहोत. हा भारताचा मनोरंजन क्षेत्राशी निगडीत जागतिक स्तरावरील भव्यदिव्य सोहळा असेल. ‘वेव्हज’ आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी १५० कोटी रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारकडून घेण्यात आला आहे’ , अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नाविन्यता, तसेच सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीज’ म्हणजेच ‘आयआयसीटी’च्या पहिल्या संकुलाचे केंद्रीय माहिती व प्रसारण, रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शुक्रवार, १८ जुलै रोजी उद्घाटन करण्यात आले. हे संकुल तात्पुरत्या स्वरूपात मुंबईतील पेडर रोडवरील ‘नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा’(एनएमआयसी) येथील एनएफडीसीच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. तर कायमस्वरूपी इमारत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत उभारण्यात येणार आहे.

या कार्यक्रमादरम्यान मुंबईतील वांद्रे – कुर्ला संकुलात १ ते ४ मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एन्टरटेन्मेट समिट’ म्हणजेच ‘वेव्हज २०२५’ परिषदेच्या फलनिष्पत्ती अहवालाचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘वेव्हज’ परिषद भारताची मनोरंजन राजधानी असलेल्या मुंबईत आयोजित करण्यासाठी आग्रही असून त्यासाठी महाराष्ट्र सरकारने १५० कोटी रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू आदी मान्यवर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल आणि एन्टरटेन्मेट समिट’ म्हणजेच ‘वेव्हज २०२५’ परिषदेत महाराष्ट्र सरकारने ८ हजार कोटी रुपयांहून अधिकचे सामंजस्य करार केले. यामध्ये यॉर्क विद्यापीठाच्या मुंबईतील पहिल्या संकुलासाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार, वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठाबरोबर १ हजार ५०० कोटी रुपयांचा करार, २०० एकर जागेवर चित्रनगरीचा विकास करण्यासाठी ३ हजार कोटी रुपयांचा करार, पनवेलमधील गोदरेज सिटी संकुलात चित्रपट, दूरचित्रवाणी आणि माध्यमक्षेत्राच्या विकासासाठी गोदरेजसोबतच्या ३ हजार कोटी रुपयांच्या कराराचा समावेश आहे.