मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शहर आणि उपनगरांमध्ये पार पडलेले भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण, जंगी मिरवणुकांसाठीचा २८ कोटी ३१ लाख रुपयांचा खर्च मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला.

भारतीय निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ रोजी आचारसंहिता लागू केली. त्यानंतर १५ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्याआधी मुंबईतील महानगरपालिका तसेच एमएमआरडीए, एमएसआरडीसी आदी यंत्रणांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन, उद्घाटन थाटामाटात करण्यात आले. कार्यक्रमस्थळी उभारलेले भव्य मंडप, व्यासपीठ, आसनव्यवस्था, स्वच्छता, वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांना त्याबाबत देण्यात आलेल्या जाहिराती, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या आगमन मार्गावर करण्यात आलेली रंगरंगोटी, मार्गावरोधक आदींचा खर्च पालिकेच्या तिजोरीतून झाला आहे.

हेही वाचा – परराज्यातून होणारी घुसखोरी रोखणार, मनसेच्या जाहीरनाम्यात आश्वासन

घाटकोपरमध्ये पार पडलेल्या जंगी मिरवणुकीची पूर्वतयारी आणि व्यवस्थेसाठी मुंबई पालिकेलाच निधी खर्च करावा लागला आहे. या मिरवणुकीच्या खर्चावरून वादही झाला होता, मात्र राजकीय दबावापोटी महापालिकेला खर्च करावा लागला होता.

टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आलेला मुंबई सागरी किनारा मार्ग, मुंबईमधील काही उड्डाणपुलांचे उद्घाटन, ‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण यासह काही प्रकल्पांचे भूमिपूजन, इतर सोहळे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी उरकण्यात आले.

हेही वाचा – गुजरातधार्जिण्या धोरणांमुळे पाच लाख रोजगार बुडाले ; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप

महापालिका प्रशासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात विविध कामांसाठी प्रस्तावित केलेल्या निधीतून या कार्यक्रमांचा खर्च भागवावा लागला आहे. त्यापूर्वीच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षात प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पणासाठी महापालिकेने केवळ ३८ लाख रुपये खर्च केले होते. त्यातुलनेत २०२३-२४ या वर्षात महापालिकेला मोठा आर्थिक भूर्दंड सोसावा लागला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्वाधिक खर्च ‘ए’ विभागात

कुलाबा, कफ परेड, नरिमन पॉइंट, चर्चगेट, सीएसएमटी परिसराचा समावेश असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या ‘ए’ विभाग कार्यालयाच्या हद्दीत २०२३-२४ मध्ये आयोजित विविध कामांसाठी महापालिकेने सर्वाधिक म्हणजे चार कोटी ५० लाख रुपये खर्च केले आहेत. त्याखालोखाल दादर, माहीमचा समावेश असलेल्या जी-उत्तर विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कार्यक्रमांसाठी महापालिकेचे तीन कोटी ७० लाख रुपये खर्च झाले आहेत. तसेच एच-पूर्व परिसरात तीन कोटी ३० लाख रुपये, के-पूर्व परिसरात दोन कोटी ५५ लाख रुपये, एफ-उत्तर परिसरात दोन कोटी, पी-दक्षिणमध्ये एक कोटी ८३ लाख रुपये, बी विभाग कार्यालयाच्या हद्दीत एक कोटी ५८ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.