मुंबई : महावितरणची वीज देशातील अन्य राज्यांपेक्षाच नव्हे, तर राज्यातील अन्य खासगी वीज कंपन्यांपेक्षाही खूपच महागडी आहे. खासगी कंपन्यांनी राज्यभरातील महावितरणच्या कार्यक्षेत्रात वीज वितरण परवाने देण्याची मागणी राज्य वीज नियामक आयोगाकडे केली असून ते मिळाल्यास महावितरणचे अनेक बडे ग्राहक स्वस्त वीजेसाठी या कंपन्यांकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महावितरणला मोठी व्यावसायिक स्पर्धा करावी लागणार असून मोठ्या ग्राहकांसह घरगुती ग्राहकही गमावल्यास मोठा फटका बसण्याची भीती आहे.

महावितरणच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही परिसर, नागपूर आदी महावितरणच्या बहुतांश कार्यक्षेत्रात टाटा, टोरेंट, अदानी या वीजकंपन्यांनी तर महावितरणने मुंबईतील बहुतांश क्षेत्रात वीज वितरणाचे परवाने देण्याची विनंती करणाऱ्या याचिका आयोगापुढे दाखल केल्या आहेत. या याचिकांवर मंगळवारपासून सुनावणी सुरु होणार आहे. महावितरणवर सुमारे ४८ लाख कृषी ग्राहकांच्या वीजपुरवठ्याची जबाबदारी असून त्यांच्याकडे सुमारे ७५ हजार ५८८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. कृषी ग्राहकांना अतिशय स्वस्त दराने वीजपुरवठा केला जातो, मात्र महसूल मिळत नसल्याने आणि थकबाकीमुळे महावितरणची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातच आयोगाने अन्य वीज कंपन्यांना राज्यभरात परवाने दिल्यावर महावितरणला मोठ्या व्यावसायिक स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे.

आयोगाने चालू आर्थिक वर्षासाठी बेस्ट, अदानी, टाटा व महावितरणचे वीजदर ठरवून दिले असून त्याचा आढावा घेतल्यास घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा सर्वच संवर्गातील ग्राहकांसाठीचे महावितरणचे वीजदर आणि अन्य कंपन्यांचे वीजदर यात खूप मोठी तफावत आहे. महावितरणची वीज अन्य वीज कंपन्यांपेक्षा महागडी असून वाणिज्यिक ग्राहकांचे दर ५०-१०० टक्के अधिक, उद्योगांचे वीजदर ३०-४० टक्के अधिक, तर घरगुती ग्राहकांसाठीचे वीजदरही ५०-८० टक्के अधिक आहेत. त्यामुळे महावितरणच्या क्षेत्रात अन्य वीज कंपनीला वितरण परवाना मिळाल्यावर स्वस्त वीज दर आणि महावितरणच्या तुलनेत दर्जेदार सेवा मिळत असल्यास ग्राहक साहजिकच अन्य कंपन्यांकडे वळणार आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरणपुढे अस्तित्वाचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

महावितरण आणि अन्य वीज कंपन्यांच्या वीजदरांची तुलनात्मक आकडेवारी :

बेस्ट

ग्राहक संवर्ग             वीजदर प्रति युनिट (रु.)

वाणिज्यिक             ६.७१ – ८.६४

समूह गृहनिर्माण संस्था ६.८६

उद्योग             ६.७१-८.४४

घरगुती

०-१००             ३.८४

१०१-३००             ७.४३

३०१-५००             ११.९१

५०१ हून अधिक १४.११

अदानी वीज कंपनी

वाणिज्यिक             ६.९६-८.६५

उद्योग             ६.८७ – ८.५३

घरगुती :

०-१००             ६.३८

१०१-३००             ९.६३

३०१-५००             ११.०३

५०१ हून अधिक १४.११

टाटा वीज कंपनी

वाणिज्यिक             ७.०२-८.६८

समूह गृहनिर्माण संस्था ६.१३

उद्योग             ६.९-८.५६

निवासी :

०-१००             ४.७६

१०१-३००             ७.९६

३०१-५००             १३.५५

५०१ हून अधिक १४.५५

महावितरण

वाणिज्यिक             १४.७४-१६.८३

उद्योग             १०.१३-१०.७८

घरगुती :

०-१००             ७.३१

१०१-३००             १३.१७

३०१-५००             १७.५६

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५०१ हून अधिक १९.१५