आर्थिक, सामाजिक किंवा इतर कोणत्याही दृष्टीने प्रभावशाली व्यक्तींचा समाजातील इतर घटकांवर प्रभाव पडतो, अशा व्यक्तींमुळे इतर व्यक्ती प्रभावित होतात असंच सामान्यपणे म्हटलं जातं. पण ज्येष्ठ नाटककार व साहित्यिक महेश एलकुंचवार यांचं याबाबतचं मत काहीसं वेगळं आहे. महेश एलकुंचवार यांनी माझ्यावर कुणाचाही प्रभाव पडत नाही, असं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडलं आहे. ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित ‘अभिजात लिटफेस्ट’चं उद्घाटन महेश एलकुंचवार यांच्याहस्ते करण्यात आलं. यावेळी महेश एलकुंचवार यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्यांना विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.

“माझ्यावर कुणाचाही प्रभाव पडत नाही”

महेश एलकुंचवार यांना यावेळी ‘तुमच्यावर कुणाचा प्रभाव आहे?’ अशी विचारणा केली असता आपल्यावर कुणाचाही प्रभाव पडत नसल्याचं ते म्हणाले. “मला जमेल तेवढ्या नम्रपणे सांगावंसं वाटतं की माझ्यावर कुणाचाही प्रभाव पडत नाही. मी कुणाचाही प्रभाव स्वीकारत नाही. भव्य माणसं असतात. त्यांच्यासमोर मी नम्रही असतो. पण अंबानी आले किंवा माधुरी दीक्षित आली तर त्यांचा माझ्यावर कधीही प्रभाव पडलेला नाही. मला उलट त्यांचा कंटाळा येतो. कारण त्यांच्याशी माझा काहीही संवाद होण्याची शक्यता नसते”, असं महेश एलकुंचवार यावेळी म्हणाले.

राजकारणावर ओझरती टिप्पणी

दरम्यान, आपल्याला राजकरणाचा किती तिटकारा आहे, याबाबत बोलताना महेश एलकुंचवार यांनी यावेळी एक टिप्पणी केली. “सत्ताधीशांच्या खिजगणतीत मी असण्याचं कारण नाही. माझ्याही खिजगणतीत ते नव्हते. पण आता आहेत. भीती वाटते म्हणून”, अशी टोकदार टिप्पणी त्यांनी केली.

ज्ञानासमोर मी नम्र होतो – एलकुंचवार

आपल्यावर कुणाचा प्रभाव पडत नसला, तरी आपण ज्ञानासमोर मात्र नम्र होतो, असं महेश एलकुंचवार यावेळी मुलाखतीत म्हणाले. “पण जिथे ज्ञान आहे, तिथे मी नम्र होतो. त्या ज्ञानाचा प्रभाव माझ्यावर पडेलच असं नाही. ज्याला रुढार्थानं लोक ज्ञानी समजतात, ते मला ज्ञानी वाटले पाहिजेत. कारण तिथेही मी माझी विवेकबुद्धी वापरणार. माझे अनुभव वापरणार. माझे काही निकष घासून पाहणार. मला जर वाटलं तो माणूस ज्ञानी आहे, तर मी त्याच्यासमोर नम्र होतो. पण म्हणून त्याच्या विचारांचा माझ्यावर प्रभाव पडेल ही शक्यता कमी आहे”, असं ते म्हणाले.

“माझी बुद्धी मर्यादित आहे हे मला माहिती आहे. पण मला माझ्या वडिलांनी सांगितलंय की तुझी बुद्धी तुला जिथपर्यंत नेईल, तिथपर्यंत जा. इकडून-तिकडून उचलून मोठा होऊ नकोस. माझा हा लहानपणापासूनचा स्वभाव आहे”, असं म्हणत एलकुंचवार यांनी त्यांच्या वडिलांची एक आठवण सांगितली.

संस्कार म्हणजे काय?

दरम्यान, यावेळी महेश एलकुंचवार यांनी संस्कारांबाबत त्यांचं सविस्तर मत मांडलं. संस्कारांचा व्यापक अर्थ वेगळा असल्याचं ते म्हणाले. “मी वेगळे संस्कार मानतो. उपनिषदांपासून आत्तापर्यंतच्या अर्थानं मी संस्कार सांगतो. संस्कार वाईट किंवा चांगले असे काहीच नसतात. कुणीतरी तुमचा अपमान केला आणि त्यावर तुम्ही प्रतिक्रिया दिली. ही क्रिया झाली. हा क्रिया-प्रतिक्रियांचा खेळ आईच्या गर्भात असल्यापासून सुरू झालेला असतो. हे संस्कार आहेत. हे संस्कार आपल्या हाताबाहेरचे, नियंत्रणाबाहेरचे, इच्छेबाहेरचे असतात. आपल्या हातात काहीच नसतं. वय वाढत जातं, तसा संस्करांचा ऐवज वाढत असतो. आपल्या क्रिया-प्रतिक्रियांमधून आपला पिंड बनत जातो. बरा, वाईट जो काही असेल तो”, असं ते म्हणाले.