मुंबई : राज्य परिवहन (एसटी) महामंडळ आणि काही महानगरपालिकांनी ‘महिला सन्मान योजने’अंतर्गत बस सेवा सुरू केली आहे. ‘महिला सन्मान योजने’च्या माध्यमातून अनुदान मिळाले, बस सुरू झाल्या, मात्र प्रवासात आणि प्रवास वेळेत कोणताही बदल झालेला नाही, अशी खंत मुंबई, पुणे, नागपूर या तीन मोठ्या शहरांमधील सरासरी ४२ टक्के महिलांनी व्यक्त केली आहे. यावरून ‘महिला सन्मान योजने’बाबत लाडक्या बहिणी नाखूष असल्याची चर्चा आहे.
‘महिला सन्मान योजना’अंतर्गत महिलांना दोन शहरादरम्यानच्या बस प्रवासासाठी ५० टक्के भाडे सवलत देण्यात येते. या योजनेद्वारे महिलांचा प्रवास आणि रोजगारात सुधारणा झाली. परंतु, शहरांतर्गत प्रवासासाठी मोफत बस प्रवास सवलत देणाऱ्या राज्यांच्या तुलनेत ती कमी आहे, असे एका अभ्यासात उघड झाले आहे. सस्टेनेबिलिटी मोबिलिटी नेटवर्कच्या वतीने परिसर व वातावरण फाउंडेशनच्या सहयोगाने निकोर असोसिएट्सतर्फे महाराष्ट्रातील सवलतीच्या बस प्रवासाविषयी अभ्यास केला. यासंदर्भातील अहवालात वरील बाब नमुद करण्यात आली आहे.
देशातील कोणकोणत्या राज्यात सर्वेक्षण केले
‘बियोंड फ्री राईड्स: अ मल्टी-स्टेट असेसमेंट ऑफ वुमेन्स बस फेअर सबसिडी स्कीम्स इन अर्बन इंडिया’ हा अहवाल सस्टेनेबल मोबिलिटी नेटवर्कने परिसर आणि वातावरण फाउंडेशनच्या सहकार्याने आणि आर्थिक संशोधन फर्म निकोर असोसिएट्सने सादर केला होता. यासंदर्भात दिल्ली, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या पाच राज्यांमधील १० शहरांमध्ये केलेल्या २,५०० हून अधिक महिलांच्या सर्वेक्षणांतून हा निष्कर्ष काढण्यात आला. महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये ६०० महिला आणि १५० पुरुषांचे मत जाणून सर्वेक्षण करण्यात आले.
दिल्ली, बंगळुरूमध्ये महिलांना मोफत बस प्रवास
मुंबई, पुणे आणि नागपूर या ठिकाणच्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४२ टक्के महिलांनी ५० टक्के बस भाडे सवलत सुरू झाल्यानंतरही त्यांच्या प्रवासात कोणताही बदल झाला नसल्याचे सांगितले. महिला सन्मान योजनेनंतर सरासरी फक्त १० टक्के महिलांनी लांबपल्ल्याचा प्रवास केल्याची माहिती दिली. याउलट दिल्ली, बंगळुरू आणि हुबळी-धारवाड सारख्या भागात मोफत बस प्रवास असून, लांबपल्ल्याचा प्रवास करण्याचे महिलांचे प्रमाण ३२ टक्के आहे. तसेच, मोफत बस प्रवास सवलत सुरू झाल्यापासून, महिलांनी बसचा वापर करण्यास सुरुवात केल्याचे ४ पैकी एका महिलेने सांगितले.
महिलांचा प्रवास सुरक्षित झाल्याचे २६ टक्के महिलांचे मत
निम्मे बस भाडे आणि मोफत बस प्रवास असलेल्या सर्व शहरांमध्ये २६ टक्के महिलांनी बसमध्ये सुरक्षित प्रवास होत असल्याचे मत व्यक्त केले.
बंगळुरूमध्ये महिलांना रोजगाराच्या संधी वाढल्या
प्रवास सवलतीनंतर मुंबई, पुणे आणि नागपूर शहरांमध्ये सरासरी फक्त पाच टक्के महिलांनी रोजगारामध्ये सुधारणा झाल्याचे सांगितले. तर, मुंबईत हे प्रमाण केवळ तीन टक्के आहे. या तुलनेत मोफत बस प्रवास असलेल्या शहरांमध्ये सरासरी १६ टक्के महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढल्या असून बंगळुरूमध्ये हे प्रमाण तब्बल २३ टक्के आहे.