मुंबई: रस्त्यांच्या कामातील अपयश लपवण्यासाठी मुंबई महापालिका खड्ड्यांच्या आकडेवारीची लपवाछपवी करीत असल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. पावसाळ्यात मुंबईकरांना रस्त्यांच्या कामांमुळे किंवा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे. खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आले आहेत, तर दुसरीकडे खड्ड्यांच्या तक्रारींसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही यंत्रणा उभारण्यात आली आहे. ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे मोबाइल अॅप वापरकर्तास्नेही असून या अॅपद्वारे नागरिकांना खड्ड्यांचे छायाचित्र, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवण्याची सोपी व जलद सुविधा प्राप्त झाली आहे. मोबाइल अॅपद्वारे करण्यात आलेली तक्रार संबंधित विभागाकडे थेट पोहोचते आणि खड्डे दुरुस्ती प्रक्रिया तातडीने सुरू होते. महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते ९ जून २०२५ पासून हे अॅप सुरू करण्यात आले आहे.
खड्ड्याच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिकेने ‘पॉटहोल क्विकफिक्स’ हे ॲप सुरू केले असले तरी या ॲपवर आतापर्यन्त किती तक्रारी आल्या त्याची माहिती पालिकेने जाहीर केलेली नाही. कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी यावरून मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. लाईव्ह डॅशबोर्डद्वारे नागरिकांना खड्ड्याची रोजची आकडेवारी उपलब्ध करून देण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पाठवलेल्या पत्रात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, अलीकडेच सुरू केलेल्या अॅपमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. या ॲपमध्ये खड्ड्यांच्या तक्रारींची, खड्डे दुरुस्त केलेल्या किंवा प्रलंबित खड्ड्यांबाबतची आकडेवारी दाखवण्यात येत नाही. दक्षिण मुंबईतील प्रत्येक प्रमुख रस्त्यांवर खड्डे आहेत. त्याकडे पालिकेच्या यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याने दक्षिण मुंबईतील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आकडेवारी लपवून ठेवून महापालिका जाणीवपूर्वक जबाबदारी झटकत असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. पालिकेने स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा ढाल म्हणून वापर करू नये, असाही इशारा मकरंद नार्वेकर यांनी दिला आहे.
महापालिकेने तातडीने ॲपसह एकत्रित केलेला लाईव्ह पब्लिक डॅशबोर्ड सुरू करण्याची मागणी नार्वेकर यांनी केली आहे. त्यामध्ये सर्व विभाग कार्यालयांच्या हद्दीतील खड्ड्यांच्या तक्रारी आणि दुरुस्तीचा कालावधी प्रदर्शित होईल. यामुळे केवळ जनतेचा विश्वास निर्माण होणार नाही, तर रस्ते अभियंते आणि अधिकाऱ्यांमध्ये जबाबदारी जाणीव निर्माण होईल, असेही मकरंद नार्वेकर म्हणाले.
व्हॉट्स अॅप चॅटबॉट….
खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महानगरपालिकेने व्हॉट्स अॅप चॅटबॉट (क्रमांक: ८९९९२२८९९९) सेवाही सुरू केली आहे. याद्वारे देखील खड्ड्यांसंदर्भातील तक्रारी नोंदविता येणार आहेत. ‘Pothole’ किंवा ‘PT’ (इंग्रजीत), तसेच ‘खड्डा’ किंवा ‘ख’ (मराठीत) असे प्रमुख शब्द (Key Word) वापरून, नागरिक व्हॉट्स अॅप चॅटच्या माध्यमातून तक्रार करू शकतात.