मंगल हनवते, लोकसत्ता
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) रिक्त ५६५ पदांसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन भरती परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी जाहीर झाला. दुसरीकडे टीसीएसच्या (टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस) माध्यमातून घेण्यात आलेल्या या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले. टीसीएसने ६३ संशयित उमेदवारांच्या चौकशीचा अंतिम अहवाल म्हाडाला सादर केला असून त्यानुसार निवड यादीतील ६३ पैकी ६० जण दोषी आढळले आहेत. यापैकी काही तोतया उमेदवार असून काहींच्या परीक्षा केंद्रातील हालचाली संशयास्पद आहेत. ‘म्हाडा’ या दोषींविरोधात पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.
‘म्हाडा’तील ५६५ रिक्त पदांसाठी डिसेंबरमध्ये होणाऱ्या ऑनलाइन परीक्षेत गैरप्रकार झाल्यानंतर ‘म्हाडा’ने टीसीएसच्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारीत परीक्षा घेतल्या. या परीक्षेदरम्यान काही तोतया उमेदवारांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याअनुषंगाने ऑनलाइन परीक्षेत मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला होता. औरंगाबादमधील एका प्रकरणाचे पुरावे ‘म्हाडा’ला सादर करण्यात आले होते. या पुराव्यांची तापाणसी केली असता गैरप्रकार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ‘म्हाडा’ने औरंगाबाद क्रांती नगर पोलिसांत चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला नव्हता. यासंबंधीचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केले होते.
पुढे परीक्षेच्या निकालातील निवड यादीतील संशयित ३६ नावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ‘म्हाडा’ला कळविली. त्यानुसार टीसीएसच्या प्राथमिक तपासणी अहवालात धक्कादायक बाब समोर आली. निवड यादीतील ३६ नव्हे तर, ६३ संशयित उमेदवार आढळले. यातून ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकार समोर आला. या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’ने या ६३ जणांचा निकाल राखून ठेवला होता. तसेच टीसीएस आणि ‘म्हाडा’च्या माध्यमातून पुन्हा सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीचा अंतिम अहवाल सादर झाला असून ऑनलाइन परीक्षेतील गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झाले. अंतिम अहवालानुसार ६० जण दोषी आढळले असून याप्रकरणी पुणे सायबर पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.
६३ पैकी ४७ जण चौकशीसाठी हजर..
निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्रांच्या तपासणीसाठी म्हाडा कार्यालयात बोलविण्यात आले होते. यावेळी सर्व उमेदवारांची कसून चौकशी करण्यात आली. त्यांची ‘बायोमेट्रिक’ तपासणी करण्यात आली. सीसी टीव्ही चित्रणातील त्यांच्या हालचाली तपासण्यात आल्या. त्यांच्या कागदपत्रांची कडक तपासणी करण्यात आली. या प्रक्रियेसाठी ६३ संशयित उमेदवारांनाही बोलवण्यात आले होते. मात्र यापैकी केवळ ४७ उमेदवार चौकशीला हजर राहिले होते.
म्हाडा, टीईटी, आरोग्य, पोलीस भरती अशा सर्वच परीक्षेत गैरप्रकार होत आहेत. याविरोधात कायदेशीर कारवाई होत आहे, मात्र या संबंधांतील राज्याचे कायदे तितकेसे कडक नसल्याने गैरप्रकार करणाऱ्या टोळय़ांचे फावत आहे. त्यामुळे राजस्थानच्या धर्तीवर कायदा कडक करावा.
– राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
परीक्षेचा अंतिम निकाल अखेर जाहीर ;५६५ पैकी ५३३ पदांसाठी निवड
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातील (म्हाडा) रिक्त ५६५ पदांच्या भरतीसाठी जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेचा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला. निकालानुसार ५६५ पैकी ५३३ पदांसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली.
म्हाडाने सरळ सेवा भरतीअंतर्गत अर्ज मागविले होते. याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. भरतीसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. त्यानंतर डिसेंबरमध्ये परीक्षा जाहीर झाल्या, मात्र त्यात मोठा गैरव्यवहार झाला, अनेकांना अटक झाली आणि ही परीक्षा रद्द करण्यात आली. म्हाडाने त्यानंतर ‘टीसीएस’च्या माध्यमातून जानेवारी-फेब्रुवारीमध्ये ऑनलाइन परीक्षा घेतल्या. परीक्षेचा निकाल घोषित करून १ हजार ६३३ उमेदवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली होती. या निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून बुधवारी म्हाडाने परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केल्याची माहिती ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली.
अंतिम निवड यादीबरोबरच प्रतीक्षायादीही जाहीर करण्यात आली आहे. या उमेदवारांना लवकरच सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचेही सागर यांनी सांगितले. उर्वरित ३२ पदे भरण्यासाठी पुन्हा निवड यादी जाहीर करून कागदपत्रांची छाननी करण्यात येईल आणि त्यानंतर ही पदे भरण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘म्हाडा’च्या https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर उमेदवारांना हा अंतिम निकाल पाहता येईल.