सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; महेश पाठक यांच्याकडे ‘नगरविकास’

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पल्लवी दराडे यांची बुधवारी बदली केल्यानंतर आता त्याच मालिकेत नगरविकास विभागातील प्रधान सचिव मनीषा पाटणकर म्हैसकर यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांना तुलनेत कमी महत्त्वाच्या अशा राजशिष्टाचार विभागात पाठवण्यात आले आहे. महेश पाठक यांची नियुक्ती नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवपदी केली आहे.

राज्य सरकारने बुधवारी चार सनदी अधिकाऱ्यांची बदली केली होती. गुरुवारी आणखी आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. मनीषा म्हैसकर या नगरविकास विभाग २ च्या प्रधान सचिव म्हणून कार्यरत होत्या. त्यांना आता राजशिष्टाचार विभागात पाठवण्यात आले आहे. त्यांच्या जागेवर अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची नियुक्ती नगर विकास विभाग २ च्या प्रधान सचिवपदी करण्यात आली.

महाराष्ट्र राज्य चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून मुंबई महानगरपालिकेत करण्यात आली आहे. तर डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांची नियुक्ती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांची नियुक्ती पशुसंवर्धन आयुक्त या पदावर करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

साईबाबा विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. मुगळीकर यांची नियुक्ती परभणीचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सी. के. डांगे यांची नियुक्ती मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून करण्यात आली. लातूर महापालिकेचे आयुक्त एम. देवेंद्र सिंह यांची बदली यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी करण्यात आली.