मुंबई : आझाद मैदानात झालेल्या मराठा आंदोलनप्रकरणातील गुन्ह्यात पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ६ जणांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. मात्र तब्येत बरी नसल्याने मनोज जरांगे-पाटील चौकशीला गैरहजर राहिले. त्यांच्या वतीने वकिलांनी बाजू मांडली. तर अन्य ३ जणांचे जबाब नोंदविण्यात आले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या काळात मुंबईत मोठ्या संख्येने मराठा बांधव आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हजारो कार्यकर्ते मुंबईत जमा झाले होते. या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तसेच परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केले. घोषणाबाजी करत रस्ते अडवून, वाहतूक रोखून धरली होती.

त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्यासह आयोजकांविरोधात ३ सप्टेंबर २०२५ रोजी आझाद मैदानात कलम १८९ (२), १८९(३), १९०, २२३ (१), २२३ (२), १२६(२), २७१ आणि २७१ अन्वये, तसचे महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कल म ३७(३), ३८, १३५, १३६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या अनुषंगाने सोमवारी पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ६ जणांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते.

मनोज जरांगे-पाटील यांच्या वकिलांनी बाजू मांडली

प्रकृती अस्वस्थ्यामुळे मनोज जरांगे – पाटील चौकशीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने ॲड. आशिषराजे गायकवाड यांनी बाजू माडली. जरांगे – पाटील यांच्यावरील आरोप अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. या गुन्ह्यात जरांगे – पाटील यांना सहआरोपी करण्यात आले आहे. त्यांच्यावरील आरोपांचे वकिलाने खंडन केले. २१ सप्टेंबर रोजी मराठी बांधव मुबई नव्हता. आंदोलन होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलन काळात गैरसोय झाल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले असतील, मात्र मी जरांगे – पाटील यांची आंदोलनामागील भूमिका पोलिसांना समजावून सांगितली आहे, असेही ते म्हणाले. जरांगे पाटील आणि आंदोलनाचे नेते संविधानाला मानणारे आहेत आणि त्यानुसारच आंदोलन सुरू होते, असा दावा त्यांनी केला.

तिघांचे जबाब नोंदवले

आझाद मैदान पोलिसांनी सोमवारी प्रशांत सावंत, वीरेंद्र पवार आणि चंद्रकांत भोसले यांचे जबाब नोंदवले. शासनाने गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील अध्यादेश काढला आहे. त्याची माहिती त्यांनी दिली. कुठलेही कृत्य बेकायदेशीर केेले नसल्याचा दावा तिघांनी केला. पांडुरंग तारक आणि सीताराम गंगाधर कळकुटे यांच्या वतीने दोन वकिलांनी आंदोलनासंबंधी लेखी माहिती सादर केली. या लेखी निवेदनामध्ये आंदोलनादरम्यान काय घडले ?, आंदोलन का करण्यात आले ? आणि त्या मागचा हेतू काय होता ? यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.